Ahilyanagar illegal gas refilling : अमेरिका-इस्त्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारलं, या युद्धाला आता 24 दिवस पूर्ण होत आलेत. या युद्धाचा सर्वात अगोदर कोणता परिणाम झाला असेल तर, तो गॅस टंचाईवर! भारताला याचा सर्वात अगोदर झळ बसली आहे. घरगुती गॅसची टंचाई जाणवू नये यासाठी व्यावसायिक गॅस वापरावर निर्बंध आणण्यात आले.
यातूनच काळ्या बाजारात व्यावसायिक सिलिंडरचे भाव दीड हजार रुपयांवरून थेट 5000 रुपयांवर गेले आहेत. व्यावसायिक गॅस टंचाईचा मुद्यावर उद्योजकांनी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर बैठक घेऊन, समस्या मांडल्या. याच दरम्यान, पोलिसांनी अवैध रिफिलिंगवर कारवाई करत, दोन कोटी एक लाख रुपयांच्या मुद्देमालासह गॅसने भरलेले तीन टँकरसह चौघांना अटक केली आहे.
अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्रात व्यावसायिक गॅस टंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी उद्योजकांनी पालकमंत्री विखे पाटील (Radhakrishna E. Vikhepatil) यांच्याबरोबर बैठक घेऊन केली. उद्योजकांनी आता कामकाजाचा आठवडा पाच दिवसांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावर कधीपासून अंमलबजावणी होते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
गॅस टंचाईचा (LGP Cylinder) सर्वाधिक फटका छोट्या-मोठ्या उद्योजकांना बसला आहे. चहा, वडापावच्या टपऱ्यांपासून ते खानावळीपर्यंत, हाॅटेल, रेस्टाॅरेंट यांना गॅस टंचाईचा फटका बसला आहे. यातून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळा बाजार वाढला आहे. दीड हजाराचा सिंलिडर थेट 5000 रुपयांवर गेला आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरची बुकिंग करून देखील, सिलिंडर वेळेपर्यंत नसल्याच्या तक्रारी आहेत. याचाच फायदा काळा बाजारात घेतला जात असून, वेळेवर, लगेच सिलिंडर हवा असल्यास 5000 रुपये घेतले जात आहेत. हा प्रकार म्हणजे, 'चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला', असं झालं आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी थेट चुली मांडायला सुरवात केली आहे.
गॅस टंचाईच्या काळात अवैध रिफिलिंगचे प्रकार वाढले आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या टँकरमधूनच थेट गॅस काढला जात असल्याच्या प्रकार अहिल्यानगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. गॅसने भरलेले तीन टँकर, चार आरोपीसंह सुमारे 2 कोटी 1 लाख 9 हजार 628 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.
पुणे ते अहिल्यानगर रोडवर कामरगांव शिवार (ता. नगर) इथं तीन गॅस टँकरमधून अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरताना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. सचिन आबा बोधले (वय 31, रा. दहिवडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव), माणिक बालाजी गुट्टे (वय 32, रा. दैठणे ता. परळी, जि. बीड), उल्हास जिवन कवडे (वय 32, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब जि. धाराशिव) आणि अमृत बाळासाहेब ठोकळ (वय 33, रा. कामरगांव, ता. नगर) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.