MLC Election 2026 Sarkrnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election 2026 : विधान परिषद रणधुमाळी! तनपुरे-विखे आमनेसामने? साडेतीन वर्षांनी रिक्त जागेवर राजकीय महासंग्राम

Ahilyanagar Local Authorities Constituency MLC election June 18, Sharad Pawar NCP Prajakt Tanpure and BJP Dr. Sujay Vikhe Patil emerging key contenders : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अखेर निवडणूक जाहीर असून प्राजक्त तनपुरे यांना ‘माघारीचं बक्षीस’ मिळणार की डाॅ. सुजय विखे पाटलांची एंट्री ठरणार गेमचेंजर?

Pradeep Pendhare

Ahilyanagar MLC Election 2026 : अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ज्येष्ठ नेते तथा दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनानंतर तब्बल साडेतीन वर्षे रिक्त असलेली ही जागा आता भरली जाणार असून, जिल्ह्यातील राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हेही जोरदार दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 18 जून रोजी मतदान (Voter) होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. 2 जूनला अर्जांची छाननी, तर 4 जूनपर्यंत माघार घेता येणार आहे. मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे.

तनपुरेंना ‘त्या’ माघारीचं बक्षीस?

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात न उतरता प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी घेतलेली माघार आता त्यांच्या राजकीय फायद्याची ठरू शकते, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुतीकडून त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी त्यांना आमदार सत्यजीत तांबे यांच्या पॅटर्नप्रमाणे अपक्ष उमेदवारीचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.

सुजय विखेंचीही जोरदार एंट्री

दुसरीकडे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये राहुरी पोटनिवडणुकीवेळी आघाडीवर असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांचे नावही चर्चेत आहे. विखे समर्थकांकडून विधान परिषदेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजप अंतिम क्षणी कोणाला अधिकृत उमेदवारी देते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नगरसेवक ‘किंगमेकर’

या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील नगरसेवकांचे महत्त्व अचानक वाढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदार निवडणुकीत हेच सदस्य मतदान करणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित झाले आहे.

ZP सदस्य मात्र बाहेर!

विशेष म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप न झाल्याने नवे सदस्य अस्तित्वात आलेले नाहीत. त्यामुळे पूर्वीचे सदस्य मतदानापासून वंचित राहणार आहेत. अन्यथा जिल्हा परिषदेचे 75 सदस्य आणि पंचायत समित्यांचे 14 सभापती यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला असता.

निवडणुकीसाठी नियम

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या किमान 75 टक्के सदस्य कार्यरत असणे आवश्यक असते. राज्यातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता आवश्यक संख्या उपलब्ध झाली आहे.

81 टक्के मतदारसंख्या पूर्ण

अहिल्यानगर जिल्ह्यातील 18 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 569 सदस्यांपैकी सध्या 461 सदस्य कार्यरत आहेत. त्यात महापालिकेचे 68 नगरसेवक व 5 स्वीकृत सदस्य, नगरपालिका सदस्य 312 आणि नगरपंचायतीचे 76 सदस्यांचा समावेश आहे. म्हणजेच 81 टक्क्यांहून अधिक मतदारसंख्या उपलब्ध झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जगताप यांच्या निधनानंतर जागा रिक्त

विधान परिषदेवर सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते अरुणकाका जगताप यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपला होता. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने ही जागा रिक्तच राहिली. आता तब्बल साडेतीन वर्षांनंतर या जागेसाठी निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघणार आहेत.

‘डार्क हॉर्स’चीही चर्चा

तनपुरे आणि सुजय विखे या दोन नावांभोवती सध्या सर्वाधिक चर्चा असली, तरी ऐनवेळी जिल्ह्याशी मूळ नाळ असलेले पण पुणे-मुंबईत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रभाव निर्माण केलेले एखादे व्यक्तिमत्त्वही रिंगणात उतरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या अखेरच्या दिवसापर्यंत या निवडणुकीत नवे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT