Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेरचा क्षणापर्यंत रंगलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्याचे नेते दत्तात्रय पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या माघारीनंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
मात्र, अर्ज माघारी घेतल्यानंतरही दत्तात्रय पानसरे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावर राजकीय कोपरखळ्या लगावण्याची संधी सोडली नाही. "आता तुम्हाला वाड्याच्या बाहेर पडावंच लागेल," असे म्हणत त्यांनी तनपुरेंना अप्रत्यक्ष सल्लाही दिला.
दत्तात्रय पानसरे म्हणाले, "आमच्या नगरसेवकांना (Corporators) प्रत्येक नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाऊन सदस्यांना भेटावे लागते. त्यांची कामे करून द्यावी लागतात. माझ्या नगरसेवकांना न्याय द्या, त्यांची कामे मार्गी लावा. कुणी इकडे-तिकडे गेले म्हणून त्यांच्यावर राग धरू नका."
भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत बोलताना दत्तात्रय पानसरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनाचाही उल्लेख केला. "पुढच्या वेळी तुम्हाला नक्की आमदार करू, असा शब्द विखे पाटील यांनी दिला आहे. आता तो शब्द कधी पूर्ण होतो, हे पाहायचे आहे. त्यासाठी माझी हात जोडून विनंती राहणार आहे," असे ते म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागील कारण स्पष्ट करताना दत्तात्रय पानसरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. दत्तात्रय पानसरे यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राचा संदर्भ देत गैरसमजातून अर्ज मागे घेतल्याचा आक्षेप नोंदविला होता. तसेच सूचकाने दिलेल्या अर्ज माघारीच्या पत्रावरील स्वाक्षरीबाबतही त्यांनी लेखी म्हणणे सादर केले. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत राजकारण, नाराजी आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.