Sandeep Kotkar Maharashtra BJP politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sandeep Kotkar BJP : विधान परिषदेसाठी ‘मास्टरस्ट्रोक’? संदीप कोतकर यांची भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा

Sandeep Kotkar joining BJP discussion : अहिल्यानगर विधान परिषदेची चार वर्षांपासून रिक्त असलेल्या जागेसाठी दिग्गज मैदानात असून, भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्याने राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.

Pradeep Pendhare

BJP Maharashtra politics: अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपकडून माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव अचानक आघाडीवर आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत कोतकर यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा असून, पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो, अशी जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

चार वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुक मैदानात आहेत. दिवंगत माजी आमदार अरुण जगताप सलग दोन वेळा विधान परिषदेत निवडून (MLC Election) गेले होते. जानेवारी 2022 मध्ये त्यांच्या कार्यकाळाची मुदत संपल्यानंतर ही जागा रिक्त राहिली होती. आता निवडणुकीचा बिगुल वाजताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या शर्यतीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure), अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून कोतकर यांनी पडद्यामागून जोरदार राजकीय हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी कोतकर परिवाराने घेतलेली भूमिका अजूनही चर्चेत आहे. कोतकर यांच्या पत्नी व माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर या निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यानंतर महापालिका निवडणुकीत ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनीही सुरुवातीला जोरदार मोर्चेबांधणी केली होती; पण अखेरीस त्यांनीही माघार घेतली. सलग दोन मोठ्या निवडणुकांतून माघार घेतल्यानंतर आता कोतकर परिवार विधान परिषदेसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील नगरसेवक निर्णायक भूमिका बजावणार आहेत. जिल्ह्यात भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्याने इच्छुकांना भाजपच्या छत्राखाली येणे अपरिहार्य मानले जात आहे. त्यामुळेच संदीप कोतकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक वजन प्राप्त झाले आहे.

भाजपची कोतकरांबरोबर बैठक?

भाजप नेतृत्वालाही स्थानिक पातळीवर मतदारांची प्रभावी जुळवाजुळव करू शकणारा, आर्थिक आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्षम उमेदवार हवा असल्याची चर्चा आहे. कोतकर यांच्याकडे ही ताकद असल्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पुण्यात चर्चेची पहिली फेरी पार पडल्याचीही माहिती समोर येत आहे.

प्राजक्त तनपुरेंचे नाव आघाडीवर!

दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या माघारीमुळे भाजपचे अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्या त्यागाची परतफेड म्हणून तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा पर्याय भाजपसमोर असल्याचीही चर्चा आहे. मात्र, तनपुरे यांच्याकडून भाजपला अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याने समीकरणे सतत बदलताना दिसत आहेत.

सचिन जगताप यांचे नाव चर्चेत

दुसरीकडे, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या नावाचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या समर्थकांकडून “नेक्स्ट एमएलसी” अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे जगताप कुटुंबीयांची भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कर्डिले-कोतकर कौटुंबिक नाते

या सर्व घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा राजकीय धागा म्हणजे आमदार अक्षय कर्डिले आणि संदीप कोतकर यांचे कौटुंबिक नाते. कर्डिले हे कोतकर यांचे मेहुणे आहेत. राहुरी पोटनिवडणुकीत सुवर्णा कोतकर आणि उदयनराजे कोतकर हे अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले होते. त्यामुळे संदीप कोतकर यांनी भाजपकडून उमेदवारी घेतल्यास कर्डिले-कोतकर हे एकाच राजकीय व्यासपीठावर दिसण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

भाजपचं धक्कातंत्र चर्चेत.....

अहिल्यानगरच्या राजकारणात आता पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत असून, भाजप अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT