Sangram Jagtap controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangram Jagtap Case : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल : पोलिसांच्या ॲक्शनवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट केल्याचा आरोप

Sangram Jagtap among 19 booked after protest : कर्जतच्या चिंचोली काळदात फाटा येथील आंदोलनप्रकरणी कारवाई; आमदार जगतापांचा आरोप ‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे’

Pradeep Pendhare

Sangram Jagtap Police Action: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या कथित विटंबनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 100 ते 150 अनोळखी व्यक्तींनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल होताच आमदार जगताप यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदुत्ववादी (Hindutva) कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील हे प्रकरण आता राजकीय वळणावर पोहोचले आहे.

कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा परिसरात 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे श्रीगोंदा-जामखेड राज्यमार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बळीराम गोपीनाथ काकडे यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या (Police) फिर्यादीनुसार, संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच कर्जत-मिरजगाव मार्गावरील प्रवाशांना मज्जाव करत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने रास्तारोको आंदोलन केल्याचा आरोप आहे.

या गुन्ह्यात आमदार संग्राम जगताप, धवलसिंह मोहिते, ॲड. आकाश सर्जेराव हाळनवर, शुभम माने, चंदनसिंग परदेशी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन तोरडमल, वैभव काळदाते, सावन शेटे, उदयसिंग परदेशी, दीपक गांगर्डे, विठ्ठलसिंग शेडगे, रघुआबा काळदाते, धनंजय बांदल, बाळासाहेब निंबोरे, राहुल मते, प्रसाद कानगुडे, बालाजी लाळगे, सुनील यादव आणि ऋषिकेश काळदाते यांच्यासह इतरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबना, निषेध आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुक्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विटंबना प्रकरणातील व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला आंदोलनाच्या आदल्या दिवशी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, संबंधित प्रकरणात अपेक्षित आणि ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा करत आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर आता आंदोलनात सहभागी झालेल्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

हिंदुत्ववादी कार्यकर्ते टार्गेट

गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्या घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “मला टार्गेट केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. मी नसलो तरी हे काम पुढे सुरूच राहील,” असे म्हणत जगताप यांनी पोलिसांच्या तपास आणि कारवाईच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले.

कर्जत प्रकरणाला आता राजकीय रंग

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अलीकडे आक्रमक भूमिका घेत असलेल्या आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने या कारवाईला आता राजकीय संदर्भ मिळाला आहे. एका बाजूला पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून कारवाई केली आहे, तर दुसऱ्या बाजूला जगताप यांनी ही कारवाई हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी होत असल्याचा आरोप केला आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेपासून सुरू झालेले हे प्रकरण आता आंदोलन, पोलिस कारवाई आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचले असून पुढील घडामोडींवर लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT