Rohit Pawar viral post : जामखेड नगरपालिकेची निवडणुकीच्या प्रचारात आमदार रोहित पवार यांचे शिलेदार सूर्यकांत मोरे यांनी भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला. प्रा. राम शिंदे उडालेल्या बल्बचे सभापती, असा शब्दप्रयोग सूर्यकांत मोरे यांनी रोहित पवार यांच्या उपस्थित झालेल्या प्रचार सभेत केला.
यावरून, विधान परिषदेतील भाजपच्या सदस्यांनी सूर्यकांत मोरे यांच्या टिकेची गंभीर दखल घेत हक्कभंगाची नोटिस बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी, यावर समाज माध्यम 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना, सभापती प्रा. राम शिंदे यांचे नाव न घेता, शाब्दिक प्रहार केला.
जामखेड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात, सूर्यकांत मोरे यांनी भाजपचे (BJP) प्रा. राम शिंदे उडालेल्या बल्बचे (आमदारांचे) सभापती असून त्यांच्या पेक्षा पंचायत समितीचा सभापतीला जास्त अधिकार असतात, अशी टिका केली. यावरून विधानपरिषदेतील भाजप सदस्य चांगलेच आक्रमक झाले. सदस्य श्रीकांत भारतीय आणि प्रवीण दरेकर यांनी सूर्यकांत मोरे यांच्याविरोधात विशेषाधिकाराची सूचना मांडली आहे. विधानमंडळ सचिवालयाकडून सूर्यकांत मोरे यांना नोटिस बजावण्यात आली असून, त्यांना दोन डिसेंबरपर्यंत लिखित खुलासा सादर करण्याचे, विधानमंडळ सचिवालयाच्या अवर सचिव संगीता विधाते यांनी म्हटले आहे.
या हक्कभंगाच्या नोटिसीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रा. राम शिंदे यांचे नाव न घेता, सभापती पदाची, विधान परिषदेच्या सभागृहाच्या गरिमाची मांडणी करत, दोन्ही बाजूने सन्मान राखला पाहिजे, असे म्हटले.
संवैधानिक पदावरील व्यक्तीने आपल्या वर्तनातून, कृतीतून संबंधित पदाची गरिमा राखली, तर सामान्य माणसंही संबंधित पदाचा मान-सन्मान राखतात. डॉ. ए.पी.जे अब्दुल कमाल यांनी राष्ट्रपती पदाची गरिमा वाढवली, डॉ. पी. सी आलेक्झांडर यांनी राज्यपाल पदाची गरिमा वाढवली, तर बाळासाहेब भारदे यांनी सभापती पदाची गरिमा वाढवली. पण आज काहीजण पदाचा वापर हा राजकारणासाठी आणि लोकांना धमकावण्यासाठी करत असल्याचं दिसतं. प्रत्येकानेच संवैधानिक पदांचा मानसन्मान ठेवणं आवश्यक आहे. पण दुसऱ्याकडून अपेक्षा करत असताना संबंधित पदांवरील व्यक्तिनेही आपल्या वर्तनातून तसा संदेश दिला, तर अधिक योग्य ठरेल, अशा शब्दात रोहित पवार यांनी सुनावलं आहे.
पदाचा वापर फक्त मिरवण्यासाठी, गुंड, मटक्यावाले, अवैध धंदे करणारे, सावकार यांना घेऊन राजकारण करण्यासाठी, गुंडांना बंदुकीचं परवाना देण्यासाठी, आदर्श आचारसंहितेला मोडीत काढून राजरोजसपणे हेलिकॉप्टरसह सरकारी यंत्रणा घेऊन फिरण्यासाठी आणि विरोधकांना धमकावण्यासाठी केला जात असेल, तर ते संविधानाला अपेक्षित नाही. पण माझ्या मतदारसंघात आज हे चित्र दिसतंय, हे दुर्दैवाने सांगावं लागतं! असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अशा अनेक नेत्यांवर भाजपकडून अत्यंत घाणेरडी भाषा वापरली गेली. विशेष म्हणजे, ही भाषा वापरणाऱ्यांमध्ये अगदी विधिमंडळ सदस्यांचा आणि मंत्र्यांचाही समावेश होता, तरीही त्यांच्यावर त्यावेळी कुणी हक्कभंग आणला नाही. पण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्यावर तातडीने हक्कभंग आणला जात, असेल तर यावरून कर्जत-जामखेडचं वजन वाढलेलं दिसतंय आणि कार्यकर्त्यांचंही वजन वाढलेलं यातून जाणवतं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
'जामखेडच्या सभेत सूर्यकांत नाना मोरे यांनी भाषणात वापरलेले काही शब्द टाळताही आले असते. कदाचित विरोधी गटातील अनेक उमेदवारांचे चुकीचे धंदे पाहून बोलण्याच्या ओघात एखाद दुसरा शब्द कमी-जास्त होऊ शकतो, पण त्यावरून लगेच हक्कभंगाची नोटिस पाठवणं योग्य नाही,' असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
'कदाचित 2019 मध्ये सूर्यकांत मोरे आमच्याकडं आल्याच्या रागातून, जुना हिशोब चुकता करण्यासाठी किंवा जामखेडमधील सभेमुळं घाबरून हक्कभंगाचं हत्यार बाहेर काढल्याचं दिसतं. पण आम्ही सामान्य घरातील कष्टकरी लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढत असल्याने कुणाच्याही दबावाच्या राजकारणाला आणि भितीला बळी पडणार नाही. संविधानाला अभिप्रेत असलेल्या लोकशाही मूल्यांचं कायम रक्षण करत राहू!' असे रोहित पवार यांनी ठामपणे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.