Ahilyanagar Property Tax Hike Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Property Tax Hike : घरपट्टी पुनर्मूल्यांकन की, 'पठाणी वसुली'? सत्ताधारी प्रशासनावर भडकले, आयुक्तांसमोर फाईल भिरकावली, नागरिकांचे फोन थेट सभागृहात

Ahilyanagar Property Tax Revaluation Sparks Uproar in Municipal Corporation : ₹5 हजारांच्या घरपट्टीची थेट ₹1.5 लाखांची आकारणी झाल्याचा दावा; लाच मागितल्याचे आरोप, फेरसर्वेक्षण कंपनीवर कारवाईची मागणी; आयुक्तांनी सोमवारी बैठकीची घोषणा

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिकेची सभा घरपट्टी पुनर्मूल्यांकनाच्या मुद्यावरून चांगलीच गाजली. नगरकरांविरोधात प्रशासन घरपट्टी पुनर्मूल्यांकनांच्या नावाखाली पठाणी वसुली करतेय, अस सत्ताधारी नगरसेवकांनीच घणाघात केला. अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांनी थेट मुद्याला हात घालत, पाच हजारांच्या घरपट्टीऐवजी थेट दीड लाखापर्यंत आकारणी झाल्याची यादीच महासभेत वाचून दाखवली.

संतापलेल्या गणेश भोसले यांनी तिच यादी महासभेत आयुक्तांच्या दिशेने भिरकावली. यानंतर नगरसेवकांनी थेट पैशांची वसुली झालेल्या नागरिकांना मोबाईलवर संपर्क साधून महासभेत ऐकवले आणि घरपट्टी पुनर्मूल्यांकनांसाठी नेमलेल्या फेरसर्वेक्षण कंपनीची पोलखोल केली.

घरपट्टी पुनर्मूल्यांकनाच्या मुद्द्यावर महासभेत सर्वाधिक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले प्रचंड आक्रमक झाले. पाच हजार रुपयांच्या घरपट्टीऐवजी थेट दीड लाख रुपयांची आकारणी झाल्याची उदाहरणे देताना, त्यांनी कंपनीने वसुली केलेल्या नागरिकांची नावे वाचून दाखवली. काही ठिकाणी पैसे घेऊन कर कमी केल्याचे गंभीर आरोप केले. एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करून फेरसर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली.

अजित पवार राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ. सागर बोरूडे यांनी गोठे आणि पत्र्याच्या खोल्यांनाही कर आकारल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर भाजप (BJP) नगरसेवक करण कराळे यांनी भाडे उत्पन्नाच्या आधारावर चुकीची आकारणी झाल्याचा आरोप करत मोकळ्या भूखंडधारकांकडील सुमारे 33 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मागणी केली.

महापालिकेला ईस्ट इंडिया कंपनीची उपमा

भाजप नगरसेवक मनोज कोतकर यांनी नागरिकांना हरकतींसाठी दिलेली मुदत संपल्यानंतर नोटिसा मिळाल्याने अन्याय झाल्याचे सांगितले. अजित पवार राष्ट्रवादी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी “महापालिका ही ईस्ट इंडिया कंपनी नाही,” असे म्हणत भाडे उत्पन्नावर 40 टक्के कर आकारणी न करण्याची मागणी केली.

घरपट्टी पुनर्मूल्यांकन फेरसर्वेक्षण रद्दची मागणी

भाजप नगरसेवक शीतल ढोणे यांनी इतर महापालिकांचा अभ्यास करून सुधारित पद्धतीने घरपट्टी आकारावी, अशी सूचना केली. अजित पवार राष्ट्रवादी नगरसेवक संपत बारस्कर यांनी मालमत्ता नावनोंदणीवेळी आकारण्यात येणारे एक टक्का शुल्क रद्द करण्याची मागणी केली. भाजपचे नगरसेवक निखिल वारे यांनी सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीवर गंभीर आरोप करत कंपनीच्या प्रतिनिधींना सभागृहात बोलावण्याची मागणी केली. त्यांनी संपूर्ण फेरसर्वेक्षण करून सध्याचे सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी केली.

महासभेत नगरसेवकांनी ऐकवल्या नागरिकांच्या तक्रारी

भाजप नगरसेवक करण कराळे यानंतर खूपच आक्रमक झाले. त्यांनी सभागृहातूनच एका नागरिकाला फोन लावला. संबंधित नागरिकाने घरपट्टी कमी करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी झाली असून 15 हजार रुपये दिल्याचा दावा केला. यानंतर अनेक नगरसेवकांनी असे फोन लावून, घरपट्टी पुनर्मूल्यांकनांबाबत नागरिकांच्या तक्रारी महासभेत ऐकवल्या.

आयुक्तांच्या लेखी तक्रारीवर नगरसेवक संतापले

गणेश भोसले यांनीही एका मालमत्ताधारकांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता वाढीव बांधकाम न दाखविण्यासाठी तीन हजार रुपये मागण्यात आल्याचा आरोप केला. यावर निखिल वारे यांनी कंपनीवर कायदेशीर कारवाई करून सर्वेक्षणाची रँडम तपासणी करण्याची मागणी केली. सत्ताधारी नगरसेवकांच्या या तक्रारींवर आयुक्त यशवंत डांगे यांनी लेखी तक्रारी मागितली.

भोसलेंनी तक्रारीची फाईल भिरकावली

गणेश भोसले यावर चांगलेच आक्रमक झाले. संताप व्यक्त करत तक्रारीची फाईल आयुक्तांच्या दिशेने भिरकावली. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत कंपनीच्या प्रतिनिधींना तातडीने सभागृहात बोलावण्याची मागणी केली. महापौर आणि उपमहापौर यांनी संबंधित कंपनीला नोटीस बजावून बोलावले जाईल, असे सांगितले. अखेर आयुक्तांनी सोमवारी सर्व नगरसेवकांसमवेत कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्याची घोषणा केली आणि तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT