Eknath Shinde rally Sangamner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde rally Sangamner : शिंदे-विखे, थोरात-तांबे यांची जोरदार बॅटिंग; डोंगर मंजूर.., 'वाघ-सिंह'ची लढाईत स्वार्थी कोण?

Ahilyanagar Sangamner Election: Eknath Shinde, Sujay Vikhe, Balasahab Thorat & Satyajeet Tambe Rallies Heat Up : संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या सभा गाजत आहेत.

Pradeep Pendhare

Sangamner political news : विधानसभा निवडणुकीवेळी जसं संगमनेर प्रचार सभांनी अन् वेगवेगळ्या प्रयोगांनी गाजत होतं, तसंच आता नगरपालिका निवडणुकीत गाजू लागलं आहे. नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे चालला आहे. तसा प्रचाराचा धुरळा उडत आहे. थंडीत देखील राजकीय वातावरण तापलं आहे.

संगमनेरच्या नगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अन् त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या सभा गाजत आहे. 'वाघ-सिंह'च्या लढाईत कोण जिंकणार, याची आता उत्सुकता आहे.

काँग्रेसचे (Congress) बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरच्या नगरपालिका निवडणुकीत, काँग्रेसचे चिन्ह बाजूला ठेवत स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक' पक्षाचे सिंह चिन्ह घेत, सर्वपक्षीय, सामाजिक संस्था, कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांना एका छताखाली आणत 'संगमनेर सेवा समिती'मार्फत निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे निवडणूक वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , सुजय विखे पाटील यांनी संगमनेर इथं सभा घेत, संगमनेरचे मैदान गाजवले. एकनाथ शिंदे सभास्थळी तब्बल चार तास उशिरा पोहोचले. त्यावेळी विखे पाटील यांनी सभेत जोरदार बॅटिंग केली. सुजय विखे पाटील म्हणाले, "आपण कसोटी खेळाडू नाही, तर 20-20चे खेळाडू आहोत. पाच मिनिटांत फटकेबाजी करून निघून जातो. आपण कपिल शर्मा नसून, विखे आहोत."

वाघच जिंकणार

''मामा-भांजे-कर्मचारी फौज तो तेरी भारी है, इस स्टेज पर बैठे मेरे 31 अब भी तुझ पे भारी है', असे म्हणून आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातील आहे. मागच्या वेळी आलो बिबटे पाहिले, संगमनेर शहरात येतो, डुक्कर पाहातो. थोडं आतमध्ये गेल्यावर पिसाळलेले कुत्रे पाहातो. आणि आता सिंह पाहायचा राहिला होता. तो देखील पाहून घेतला. हा प्रश्न पडला की, हा सिंह यांना का आणावा लागला, असे म्हणताना टायगर को रोखने के लिए सिंह की जरूरत है, पण दुर्दैवाने टायगरविरुद्ध लायन लढाईत टायगरचं जिंकतो,' असा टोला सुजय विखे पाटलांनी थोरातांचे नाव न घेता लगावला.

नगरपालिका कारभाराची चौकशी

'एकनाथ शिंदे सभास्थळी पळतच पोहोचले. त्यांनी गेली 40 वर्षे राजकारणाचा अड्डा म्हणून नगरपरिषदेचा ज्यांनी वापर केला, त्यांना धडा शिकवायचा आहे. वर्षानुवर्षे सत्तेचा मिदा खाणाऱ्यांनी जनतेला विकासापासून दूर ठेवले. 2010 पासून नगरपालिकेच्या कारभाराची चौकशी करू,' असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. तसंच एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीचे आदेश दोन महिन्यात काढण्याचे, पालिकेच्या बंद काॅटेज हाॅस्पिटलच्या जागेवर महिला व बालकांसाठी रुग्णालय, बसस्थानकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा, पुणे-नाशिक रेल्वे मार्ग संगमनेरमार्गे नेण्यासाठी मोदी, शहांकडे आग्रह धरण्याचे व संगमनेरमधील ड्रग माफियांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले.

शिंदे डोंगरही मंजूर करतील; थोरातांचा टोला

बाळासाहेब थोरात यांनी जोरदार सभेत घेत, प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना भर सभेतून फोन करून, एमआयडीसी मंजूर झाल्याचा सांगितलं. तसा एकनाथ शिंदेंचा उदय सामंत यांना भर सभेत झालेल्या काॅल ऐकवत नक्कल केली. टहे जिथं जातील तिथं एमआयडीसी मंजूर करतात. लोक म्हंटले थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. धरणाला नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी नाही डोंगर मंजूर, असे म्हणत निवडणुकीत बनवाबनवी करायची यांना सवय झाली आहे. पण आता अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम चालणार नाही. लोकांच्या लक्षात आलं आहे,' असा टोला थोरातांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

वाघ स्वार्थी प्राणी; तांबेंचा विखेंना टोला

सत्यजीत तांबे यांनी, सुजय विखे पाटील यांना सभेतून सुनावलं. काल एक टायगर पण सभेला आले होते. ते म्हणाले टायगर आणि सिंहाच्या लढाईत टायगर जिंकत असतो. पण टायगर हा एकटा चालतो आणि सिंह सगळ्यांना घेऊन चालत असतो, तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही, असा खोचक टोला लगावला. ते म्हणाले रोज रोज येऊन भाषण करायला मी कपिल शर्मा आहे का? राजकीय कार्यकर्त्यांचे भाषण करमणुकीसाठी नव्हे, तर लोकांच्या हितासाठी असावं. मी शिंदे साहेबांचा प्रचंड आदर करतो. त्यांनी मला आत्तापर्यंत 50 कोटींचा निधी दिला आहे. मात्र कालच्या सभेत त्यांना शेजारी उभे राहून तांबेंवर बोला हे सांगितलं जात होतं म्हणून ते बोलले, असे निरीक्षण सत्यजीत तांबे यांनी नोंदवत विरोधकांना सुनावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT