Rahuri Tanpure Sugar Factory : राहुरीतील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी 31 मे रोजी मतदान होत असून, एक जून रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी या कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. या निवडणुकीच्या प्रचार सांगतावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मोठं विधान केलं आहे.
यामुळे राहुरी तालुक्यातील राजकीय ढवळून निघालं आहे. "मी 'तुतारी'चा निष्ठावंत आहे. सहकार खाते 'घड्याळा'कडे आहे, असे सूचक म्हणत, येत्या आठवडाभरात तालुक्याला गोड बातमी देणार, यामुळे सुखद धक्का मिळेल, कारखाना चालू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.
जनसेवा मंडळ पॅनल उभा करत, तनपुरे सहकारी साखर कारखाना चालविण्याचे शिवधनुष्य सभापती अरुण तनपुरे यांनी उचलले आहे. तनपुरे कारखान्याची निवडणूक झाल्यावर आठवडाभरात तालुक्याला गोड बातमी मिळेल, असेही अरुण तनपुरे यांनी म्हटले आहे. हाच धागा पकडत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी, मी तुतारीचा निष्ठावंत आहे. सहकार खाते घड्याळाकडे आहे. येत्या आठवडाभरात तालुक्याला सुखद धक्का मिळेल, कारखाना चालू करण्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे म्हटले आहे.
माजी मंत्री तनपुरे यांच्या या विधानामुळे राहुरी तालुक्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चांना तोंड फुटलं आहे. तनपुरेंच्या पुढील राजकारणाची कोणती दिशा गोड असेल? कोणता सुखद धक्का असेल? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) इनकमिंग वाढलं आहे. विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षावतीने अनेक आजी-माजी नेते अजितदादांच्या पक्षात चालले आहेत.
श्रीगोंद्यातील माजी आमदार राहुल जगताप, शिवसेना ठाकरे पक्षाचे राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यातच प्राजक्त तनपुरे यांनी कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने लवकरच गोड बातमी देईल, असे सांगून राजकीय चर्चांची राळ उडवून दिली आहे.
जयंत पाटील यांच्या संस्थाच्या कार्यक्रमांना मध्यंतरी भाजप नेते नितीन गडकरी हजेरी लावून गेले. तेव्हापासून जयंत पाटील राजकीयदृष्ट्या सावध झाले आहेत. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांना आमदार रोहित पवार यांच्याकडून आव्हान मिळत आहे. यामुळे जयंत पाटील यांची भाजप महायुतीमधील नेत्यांशी असलेली मैत्री चर्चेत आली आहे. प्राजक्त तनपुरे जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तनपुरे यांचे राजकीय मार्गदर्शन म्हणून जयंत पाटलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. यात तनपुरे यांनी केलेले वरील विधान चर्चेत आले असून, त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
प्राजक्त तनपुरे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये सत्ताधाऱ्यांना विरोधाला विरोध केला नाही. कारखान्याला अडचणीत आणले नाही. उलट दोन हंगामांत पुरेशी ऊसतोडणी यंत्रणा नव्हती. त्यावेळी प्रसाद शुगरतर्फे ऊस पुरवठा केला. मागील तीन वर्षांपासून कारखाना बंद आहे. प्रसाद शुगर नसता, तर शेतकऱ्यांचे हाल झाले असते. एखादा कारखाना काढणे सोपे नाही. कारखाना चालविण्याचे उत्तरदायित्व अरुण तनपुरे यांनी स्वीकारले आहे. निवडणुकीतील तिन्ही पॅनलमध्ये कारखाना चालविण्याची क्षमता असलेले ते एकमेव नेतृत्व आहेत. कामधेनू योग्य हातात द्यावी, असे आवाहन केले.
विधानसभा निवडणुकीत भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्याकडून प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला. शिवाजी कर्डिल यांनी 2019 मधील पराभवाचा वचपा घेतला. कर्डिले यांनी विजयासाठी केलेले सूक्ष्म नियोजन, अन् शेवटच्या टप्प्यात केलेली व्यूहरचनेमुळेच, मविआ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.