Shrirampur Zilla Parishad school land : श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या सरकारी जागेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर पाच जणांविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तऐवज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गळनिंब इथल्या अशोक बाबुराव बाहुले यांनी ही फिर्याद दाखल केली होती. गळनिंब इथल्या ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 118 ही शासकीय मालकीची असून तेथे मुलांची मराठी शाळा भरत असे. 1971-72 च्या ग्रामपंचायत उताऱ्यावरही 'मराठी मुलांची शाळा', अशी स्पष्ट नोंद असताना संबंधित जागा विक्रीयोग्य नसल्याचे स्पष्ट आहे.
सरकार अथवा जिल्हा परिषद (Zilla Parishad) मालकीची मालमत्ता खाजगी व्यवहारातून विकता येत नाही, हा मूलभूत नियम असतानाही काही गाव पुढाऱ्यांनी संगनमत केल्याचा आरोप आहे. सदर वय्क्तींनी ग्रामपंचायतीला हाताशी धरून तिथं बेकायदेशीरपणे 'पंच कमिटी' अशी नोंद लावली.
यानंतर बनावट खरेदीखत तयार करून कोणतीही सरकारी किंवा जिल्हा परिषदेची परवानगी न घेता 17 एप्रिल 1997 रोजी ही जागा केवळ 41 हजार रुपयांना ताराबाई शिंदे यांच्या नावावर विक्री केली. या जागेचे बाजारमूल्य 5 लाख रुपयांपेक्षा जास्त होते. विशेष म्हणजे, या विक्रीतून मिळालेले पैसे ग्रामपंचायतीत किंवा शासनाकडे जमा न करता आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा अपहार केला, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
या प्रकरणी अशोक बाहुले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती; मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यानंतर अॅड. एन. जी. खंडागळे यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली. न्यायालयाने पोलिसांना चौकशीचा आदेश दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. पोलिसांच्या अहवालानंतर झेडपीच्या शाळेच्या जागेची विक्री परस्पर झाल्याचे समोर आले अन् गु्न्हा दाखल करण्याचा आदेश झाला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी काटकर विजया एन. एस. यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. यानंतर ताराबाई रघुनाथ शिंदे, चांगदेव यशवंत भागवत, हनुमंत भिकाजी चिंधे, जिजाबा दादा वडितके, दगडू केरु शिंदे या पाच जणांविरुद्ध संगनमत करून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या बाजूने एन. जी. खंडागळे यांनी काम पाहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.