Ahilyanagar Revenue Department News : संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी अहिल्यानगर तलाठी संघटनेचे अध्यक्ष तथा ग्राममहसूल अधिकारी विक्रम ओतारी यांना शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून, तलाठी संघटना आणि तहसीलदार यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. संबंधित तहसीलदारांचे तातडीने निलंबन करावे, अशी मागणी पाथर्डी तालुका तलाठी संघटनेने केली आहे.
या मागणीसाठी तलाठी संघटनेने पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक यांच्यामार्फत निवेदन सादर केले. विशेष म्हणजे, तहसीलदारांविरोधात कारवाईची मागणी करणारे निवेदन दुसऱ्या तहसीलदारांकडेच सादर करण्याचा हा अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी तहसीलदार किशोर सानप उपस्थित होते. तहसीलदार मांजरे यांच्यावर तीन दिवसांत कारवाई न झाल्यास निवडणूक आणि दुष्काळी टंचाईशी संबंधित कामे वगळून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील तलाठी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होत नसल्याने 14 ऑक्टोबर रोजी तलाठी विक्रम ओतारी यांच्यासह दहा ते पंधरा तलाठी आणि मंडळ अधिकारी वेतनाबाबत चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी तहसीलदार (Tehsildar) कार्यालयात उपस्थित नसल्याने कर्मचाऱ्यांनी आस्थापना विभागाकडून वेतनाबाबत माहिती घेतली. वेतनाची बिले उपकोषागार कार्यालयात प्रलंबित असल्याचे समजल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तेथे पाठपुरावा केला. त्यानंतर वेतनाची बिले मंजूर करण्यात आली, असे तलाठी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
या घटनेनंतर तहसीलदार धीरज मांजरे यांनी विक्रम ओतारी यांना दूरध्वनी केला. संघटनेची बैठक घेण्याबाबत जाब विचारतानाच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याची धमकी दिल्याचा आरोप तलाठी संघटनेने केला आहे. या संभाषणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले असून, त्यामध्ये शिवीगाळ केल्याचे शब्द स्पष्टपणे ऐकू येत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी तहसीलदारांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंग तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. केवळ शिवीगाळ आणि धमकावण्याच्या प्रकरणापुरतीच कारवाई मर्यादित न ठेवता तहसीलदारांच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
कर्मचाऱ्यांना धमकावणे, नियमबाह्य कामकाजासाठी कोतवालांची नियुक्ती करणे, महिला तलाठ्यांना नियमबाह्य विभागांमध्ये कामासाठी वर्ग करणे आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावणे, अशा विविध आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तलाठी संघाचे अध्यक्ष वैभव कराड, उपाध्यक्ष जालिंदर सांगळे, सचिव प्रदीप मगर आणि कार्याध्यक्ष हरीश नांगरे यांच्यासह शिष्टमंडळाने पाथर्डीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले. तीन दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्याने आता प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.