प्रदीप पेंढारे :
Ahmednagar News: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) कोण उमेदवार असणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी 'सरकारनामा'शी बोलताना पुन्हा मोठे भाष्य केले आहे. "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार कुटुंबातीलच उमेदवार असणार आहे. शरद पवार गटाकडून आमदार नीलेश लंके यांचे नाव घेण्याचे कारण आता उरलेलेच नाही",असेही राजेंद्र फाळके यांनी स्पष्ट केले आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांनीच उमेदवार दिला आहे. ही जागा राष्ट्रवादीनेच लढवली आहे. त्यामुळे 2024 देखील लोकसभेची नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच लढेल. "नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडेच असून, शरद पवारच येथे उमेदवार निश्चित करणार आहेत", असेही जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले.
"2024 च्या लोकसभेसाठी शरद पवार कुटुंबातील उमेदवार नगर दक्षिणमध्ये असणार आहे. एक प्रकारे आमदार रोहित पवारच मैदानात असतील. ते सध्या नाही म्हणत असले, तरी नगर दक्षिणसाठी पहिल्यापासून शरद पवार लक्ष ठेऊन आहेत. हे रोहित पवार यांच्यासारख्या युवा नेत्याच्या नजरेतून सुटलेले नाही. त्यामुळे रोहित पवार हे शरद पवार यांच्यासाठी नक्कीच मैदानात येतील", असेही ते म्हणाले.
"आमदार रोहित पवार यांनीच ही जागा लढवावी, असे शरद पवार यांनी चाचपणीच्या घेतलेल्या बैठकीतही सूर राहिला. त्यामुळे इतर कोणत्या गटाकडून कोणाचे नाव येण्याचे कारण नाही. शरद पवार गटाकडून आमदार नीलेश लंके यांचे नाव येण्याचे आता तर काहीच कारण उरलेले नाही. त्यांचा काय निर्णय घ्यायचा, ते ज्या गटात आहे, तिथे होईल", असेही फाळकेंनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नगर दक्षिणबाबत राष्ट्रवादीचा शरद पवार गट परस्पर निर्णय घेऊ शकत नाही. राज्यात आणि देशात महाविकास आघाडी आहे. त्यामुळे राज्यासह देशातील प्रत्येक लोकसभेच्या जागेबाबत बसून निर्णय होईल. अजून तरी महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या चाचपणीसाठी झालेल्या बैठकांची हवा काढून घेतली. यावरही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी भाष्य केले आहे.
"नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी लढत आली आहे. हे सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी असली, तरी सर्व घटक पक्षांना या जागेबाबत शरद पवारांची भूमिका माहीत आहे. त्यामुळे विरोध होण्याचे कारण नाही आणि या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच उमेदवार असेल",असेही फाळके म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.