Karajat Nagarpanchayat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar panchayat Officer : लेखापालाच्या तिखट आणि उपरोधिक पत्रानंतर माजी नगराध्यक्षाचा तीळपापड

Pradeep Pendhare

Nagar News : कर्जत नगरपंचायातीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी काही विषयासंदर्भात दिलेल्या पत्राला, प्रशासनाने तिखट आणि उपरोधिक भाषा वापरत सल्ला देणारे उत्तर दिले आहे. नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेऊन याची माहिती दिली.

कर्जत नगरपंचायतीचे काही विभागाचे खाते कर न भरल्याने आयकर विभागाद्वारे सील केले गेले आहेत. याबाबत लेखापाल यांनी उचित कार्यवाही करून ते पूर्ववत करावे. जेणेकरून विस्कळीत झालेले कामकाज तसेच डिझेल आणि इतर देणी मार्गी लागतील, या आशयाचे पत्र नगराध्यक्षा उषा राऊत यांनी कर्जत नगरपंचायतीच्या लेखापाल नयना कुंभार यांना लिहिले होते. मात्र नयना कुंभार यांनी या पत्राला आपला कार्यालयीन वेळ वाया जाणार नाही, असा उपरोधिक सल्ला देत उत्तर दिल्याने माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नामदेव राऊत म्हणाले, प्रति नियुक्तीवर असणाऱ्या कर्जत नगरपंचायतीच्या लेखापाल नयना कुंभार ह्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी नगरसेवक- नगरसेविका यासह नगराध्यक्षा यांची अडवणूक करणे, त्यांना उद्धटपणे बोलणे, चुकीची वागणूक देणे, असे प्रकार करीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि नगरपालिका शाखा यांना यापूर्वीच लेखी तक्रार दिल्या आहेत.

मागील पंधरा दिवसांपासून कर्जत नगरपंचायतीच्या काही विभागाचे खाते आयकर विभागामार्फत सील करण्यात आले असल्याचे नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी लेखापाल नयना कुंभार यांच्याकडे रीतसर पत्राद्वारे लेखा विभाग उचित कार्यवाही करीत नसल्याचे अधोरेखित केले. यामुळे कर्जत नगरपंचायतीचे कामकाज विस्कळीत झाले असल्याचे पत्रात नमूद केले. यामुळे घंटागाडी वाहनाचे डिझेल यासह कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर देणी प्रलंबित पडले असून संबधित विभागाचे खाते तात्काळ लक्ष घालून चालू करण्याची मागणी केली.

यावेळी उषा राऊत यांच्या पत्रास उत्तर देताना कुंभार यांनी त्यांनाच अजब सल्ला दिला. "वैद्यकीय कारणाने आपण रजेवर आहात. त्यामुळे आपण लेखा विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, हे कोणत्या आधारावर आरोप करता याची शंका आहे. आयकर विभागाचा मागील काळातील दंड असून ती जबाबदारी विद्यमान लेखापालाची नाही.

तरी सुद्धा नगरपंचायतीचे हित पाहता त्याची तजवीज सुरू असून सदरची दंड रक्कम उपलब्ध झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी देत असताना आगामी काळात आपण संपूर्ण माहिती घेऊन पत्र व्यवहार कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. जेणेकरून आपला कार्यालयीन वेळ वाया न जाता अजून तत्परतेने काम करता येईल", असा शेरा उषा राऊत यांच्या पत्रावर दिला. या उत्तर पत्राचा खरपूस समाचार नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतला.

नामदेव राऊत यांनी लोकप्रतिनिधींना, असे उत्तर देणे त्यांना शोभत नाही, असे म्हटले आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने उषा राऊत यांनी पत्रव्यवहार केला असता त्यास एका अधिकाऱ्यांने आपला कार्यालयीन वेळ वाया जात असल्याचे उत्तर देणे अपेक्षित नाही. सरकारने त्यांची नियुक्ती याच कामासाठी केली आहे. याचा ते पगाराद्वारे मोबदला घेत आहे. त्यांनी आपली कार्यपद्धतीत सुधारणा करावी. अन्यथा 10 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे उपोषणाचा इशारा नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

SCROLL FOR NEXT