Sachin Jagtap MLC Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sachin Jagtap MLC Election : प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर? ससाणे-जगताप-भोसले यांनी नेले अर्ज, अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील 48 तास निर्णायक

Speculation over Prajakt Tanpure BJP entry and Congress, Ajit Pawar NCP rising lobbying for candidature heats up Ahmednagar Legislative Council politics : विधान परिषदेच्या उमेदवारीच्या चर्चांनी अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण तापले असून, महाविकास आघाडी आणि महायुतीत अद्याप सस्पेन्स कायम आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Legislative Council election : अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असतानाच आता अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे.

शनिवारी (ता. 30) तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, त्यांच्याच नावाची महायुतीकडून विधान परिषदेसाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज नेण्यासाठी विविध पक्षांतील इच्छुकांनी हालचाली वाढवल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. काँग्रेसचे (Congress) श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण ससाणे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांनीही उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजप, अजित पवार गट आणि शिंदे शिवसेनेतही अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत.

या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 461 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, मतदार यादीतील नाव, पत्ता आणि वयातील त्रुटींमुळे अनेक नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे राजपत्रातून निवडणूक आयोगाने मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. मात्र, या यादीतील काही नावांमध्ये विसंगती आढळून आल्याने संबंधितांनी हरकती दाखल केल्या आहेत.

मतदानासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यांसारख्या कागदपत्रांतील तपशील आणि मतदार यादीतील माहिती जुळणे आवश्यक असल्याने अनेक नगरसेवकांनी पुराव्यांसह दुरुस्ती अर्ज सादर केले आहेत. आता या हरकतींवर सुनावणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत.

उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची यादी

भाऊसाहेब शिंदे, सुधीर वैरागर, कमलेश गांधी, आशिष शेलार, संतोष चोळके, प्रीती कदम, मनीषा कदम, ॲड. शिवाजी शिंदे, प्रवीण दळवी, अनिल तुपे, प्रवीण लोखंडे, अंकुश काळे, ज्ञानदेव पाडळे, करण ससाणे, दत्तात्रेय म्हैस, चैतन्य राणे, गणेश भोसले, सचिन जगताप आणि विशाल कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

नगरच्या राजकारणात पुढील 48 तास निर्णायक

प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच विविध गटांकडून उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू असल्याने अहमदनगर विधान परिषद निवडणूक राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT