Ashok Kataria, Nagar Urban Bank ltd Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Bank Scam : नगर अर्बन बँकेच्या 'या' बड्या आरोपीला बेड्या

Pradeep Pendhare

Ahmednagar Bank News :

नगर जिल्ह्यातील सर्वात गाजलेले आणि चर्चेत असलेले प्रकरण म्हणजे नगर अर्बन बॅकेतील घोटाळा. या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया पळण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली आहे. नगर अर्बन बॅंक गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

नगर अर्बन बॅंकेचा (Nagar Urban Co-op. Bank Ltd) माजी अध्यक्ष अशोक कटारिया (Ashok Kataria) हा पळून जाण्याच्या तयारी होता. कटारिया हा नगर अर्बन बॅंकेतील सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी परिवाराचे निकटवर्तीय आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला आळेफाटा (पुणे) येथून आज पहाटे ताब्यात घेऊन अटक केली. आता त्याला दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे. (Ahmednagar)

नगर अर्बन बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणात 26 जानेवारीला भाजपचा (BJP) माजी नगरसेवक तसेच माजी संचालक मनेष साठे आणि नगर अर्बन बॅंकेचा माजी उपाध्यक्ष अनिल कोठारी यांना अटक केली होती. या दोघांना न्यायालयाने 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिस या प्रकरणी सक्रिय झाल्यानंतर नगर अर्बन बॅंकेचे संचालक मंडळ आणि बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे भाजपचे दिवगंत माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि त्यांच्या परिवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या गांधी परिवार नगरमध्ये नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर अर्बन बॅंकेतील गैरव्यवहाराच्या तपासणीसाठी फॉरेन्सिक ऑडिट झाले आहे. यानुसार आरोपींची संख्या 102 असून, यात वाढ होण्याची शक्यता आहे. या गैरव्यवहार प्रकरणी सुरुवातीला बॅंकेतील अधिकारी प्रदीप पाटील आणि राजेंद्र लुलिया यांना अटक करण्यात आली. आता हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, गैरव्यवहाराच्या तपासासाठी बॅंक अधिकारी आणि संचालकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

नगर अर्बन बॅंकेतील गैरव्यवहारात राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल केला होता. यानंतर नगर अर्बन बॅंकेतील गैरव्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. यात 291 कोटी 25 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.

नगर अर्बन सहकारी बँकेतील कर्ज गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर आणि दोन पोलीस निरीक्षक, पाच पोलीस अंमलदार यांचा विशेष पथकात समावेश आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT