ATF Fuel Theft Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ATF Fuel Theft : केंद्रीय मंत्री नायडू यांच्या खात्याच्या, हवाई इंधनाची चोरी; फडणवीसांच्या गृहविभागाची अहिल्यानगरमध्ये धडाकेबाज कारवाई, 90 लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात

Ahilyanagar Local Crime Branch cracks ATF fuel theft case; two accused arrested in Belwandi, Shrigonda : विमानमधील इंधन टँकरमधून चोरी करताना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेलवंडी श्रीगोंदा इथं दोघांना अटक केली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar crime news : इराण आणि इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे देशभरातील इंधनच्या दरावर परिणाम झाला आहे. विमानापासून ते वाहनांच्या इंधनापर्यंतच्या दरात चढउतार होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यासाठी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF), म्हणजेच विमान इंधनाच्या नव्या दरांची घोषणा केली असून, त्यात तब्बल 115 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

अशा काळात इंधनाचा काळाबाजार वाढणार असल्याचे संकेत मिळत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याच्या अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिस अॅक्शन मोडवर येत, बेलवंडी (ता. श्रीगोंदा) शिवारात थेट विमान इंधन चोरी रोखण्याची धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस (Police) निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गेल्या काही दिवसांपासून, अहिल्यानगर जिल्ह्यातून टँकरद्वारे वितरीत होणाऱ्या विमानात इंधन म्हणून वापरण्यात येणारे, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) चोरी होत असल्याची माहिती मिळली होती. खबऱ्याकडून येणाऱ्या माहितीचे क्राॅस चेक केल्यावर, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्रीगोंद्यातील बेलवंडी परिसरात स्थानिकच्या पथकाने छापा घालत कारवाई केली.

टँकरमधून विमानतळांना वितरीत होत असलेल्या हवाई इंधन, श्रीगोंद्यातील (Shrigonda) बेलवंडी इथं छुप्यापद्धतीने, चोरीने काढून घेत असतानाच, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने लावलेला सापळा अवळला. पोलिसांनी कारवाईत हवाई इंधनाच्या टँकरसह दोघांना पथकाने ताब्यात घेतलं. हवाई इंधनाने भरलेले सात ते आठ ड्रम, रिकामे 20 ते 24 ड्रम, टँकरमधून इंधन उपसण्यासाठी विद्युत पंप, असा एकूण सुमारे 88 लाख 58 हजार 770 रूपयांचा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा

विमान टर्बाइन इंधन (विपणन नियमन) आदेश 2001 नुसार हवाई इंधन चोरी किंवा अवैध वाहतूकप्रकरणी पंचनामा करण्याचा अधिकार उपअधीक्षक दर्जाचा अधिकाऱ्यांना आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असली, तरी रात्री उशिरापर्यंत कर्जत विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यामार्फत पंचनामा करण्यात आला.

काळाबाजाराची शक्यता

पोलिसांनी पकडलेले हवाई इंधनाचा वापर हा रंगात किंवा थिनरसाठी होत असल्याचा संशय आहे. यात मोठा काळाबाजार अन् रॅकेटची शक्यता पोलिसांनी वर्तवली. अहिल्यानगर पोलिस दलाने गेल्या महिन्यात मोठी पेट्रोल इंधनाची चोरी नगर तालुका पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आणली होती. त्यापाठोपाठ आता हवाई इंधन चोरीचा प्रकार उघडकीस आणला.

गृहखात्याची दमदार कामगिरी

हवाई इंधन चोरीप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात ही अलीकडच्या काळातील पहिलीच मोठी कारवाई आहे. त्यामुळे इंधन तस्करी करणाऱ्यांच्या बाजारात धाबे दणाणले आहेत. केंद्रीय हवाई मंत्री किंजरापु राममोहन नायडू आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या अख्यारीत असलेल्या खात्याशी निगडीत, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याच्या, अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाने कारवाई केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

पेट्रोलियम मंत्र्यांचा आदेश

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंधन साठेबाजीवर कारवाई करण्याचा आदेश आहे. यानुसार देशभरात कारवाई सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाच्या पोलिस दलाने, थेट अहिल्यानगरमध्ये हवाई इंधन चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. या हवाई इंधन चोरीचे धागेदोरे लांब-लांबपर्यंत जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT