Ajit Pawar Plane Crash : अजितदादांसारख्या धडाडीच्या नेत्याचं असं अचानक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्या उमद्या, सतत हसतमुख आणि जिंदादिल व्यक्तिच्या अकस्मात निधनाची बातमी कधी कानावर येईल, असं मलाच काय, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला वाटलं नसेल. त्यामुळे त्यांचे निधन झाल्याच्या बातमीवर विश्वास बसत नाही.
परंतु दुर्दैवाने हे वास्तव स्वीकारण्याची कठीण वेळ आज आपल्यावर आली आहे. व्यक्तिगत मला स्वतःलाही यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे. अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला.
अजित पवारांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आपल्या आठवणी जागवल्या असून दादांनी माझ्या ज्येष्ठत्वाचा कायम सन्मान केला असं म्हटलं आहे.
छगन भुजबळ यांनी म्हटलं की, 'कडक शिस्तीचे प्रशासक' अशी ओळख असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल ११ वेळा मांडला असून ते महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरले. त्यांच्या कामाचा मुख्य भर हा प्रशासकीय शिस्त, पायाभूत सुविधा आणि आर्थिक नियोजन यांवर राहिला. पिंपरी-चिंचवड शहराला 'सर्वात वेगाने विकसित होणारे शहर' बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
बारामती, पुणे, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या धडाडीच्या कामातून त्यांनी एक वेगळा ठसा निर्माण केला. तळागाळातील शेवटच्या माणसाचा विचार करणारा हा लोकनेता होता. पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागणारा हा झंझावात महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र धावत होता.
अजितदादादांशी माझे ऋणानुबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीपासून आहेत. करारी, रोखठोक स्वभाव असलेल्याअजितदादांनी विचारांशी कदापि तडजोड केली नाही. मला वाटतं हेच त्यांच्या आणि माझ्या स्वभावातील साम्य होतं. त्यांनी मा. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात बारामतीच्या स्थानिक राजकारणापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पवार साहेबांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची नस ओळखणारा आणि सर्वसामान्यांशी जोडला गेलेला जमनीवरील नेता अशी त्यांची ओळख होती. याच जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट ठसा उमटविला
स्वभावाने रोखठोक, प्रशासनावर घट्ट पकड आणि व्यक्तिमत्वात एक दरारा असलेला राजकारणी अशी प्रतिमा असूनही मनाने अतिशय स्वच्छ आणि जिंदादिल असलेल्या अजितदादांचा वावर चैतन्य निर्माण करणारा असायचा. पत्रकारांशी बोलताना प्रतिकूल असलेल्या प्रश्नांवरही मिश्किल चिमटे काढणारे दादा, अनावधानाने काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करणारे दादा देखील या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यांनी माझ्या ज्येष्ठत्वाचा कायम सन्मान केला. दादांनी मला आणि आमच्या भुजबळ कुटुंबाला दिलेलं प्रेम कायम स्मरणात राहील.
पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. अजितदादा यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना! दादा,हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.