Akole Sarpanch Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Akole Sarpanch : सरपंच दोन वर्षांपासून अनुपस्थित; 8.41 लाखांचा निधी पडून, अकोल्यातील ग्रामस्थ आक्रमक

Ekdare villagers allege prolonged sarpanch absence, stalled development funds and seek immediate administrative action : एकदरे ग्रामपंचायतीचे कामकाज प्रभावित झाल्याचा आरोप; मासिक सभा, ग्रामसभा आणि विकासकामांवर परिणाम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे

Pradeep Pendhare

Akole sarpanch absent for two years : अकोले तालुक्यातील एकदरे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर सरपंच योगेश ऊर्फ रामा भांगरे यांच्या दीर्घ अनुपस्थितीचा परिणाम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सरपंच गावात आणि ग्रामपंचायतीत उपस्थित नसल्याने विकासकामांना अडथळा निर्माण झाला असून, 15व्या वित्त आयोगाचा सुमारे 8 लाख 41 हजार रुपयांचा निधी तसेच पेसा निधी खर्चाविना पडून असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सरपंचांच्या (Sarpanch) अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायतीचे नियमित कामकाज, मासिक सभा आणि ग्रामसभा यावरही परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अमर माने यांच्याकडे लेखी तक्रार केली. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एकदरे गावाची लोकसंख्या एक हजारांहून अधिक असून ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) पाच सदस्य आहेत. उपसरपंच लीला भांगरे यांच्यासह नानासाहेब भांगरे, अनिल पोटे आणि मंदा भांगरे हे चार सदस्य कार्यरत आहेत. मात्र, सरपंच अनुपस्थित असल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत अडचणी निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उपसरपंच लीला भांगरे यांनी, सरपंचाच्या अनुपस्थितीमुळे गावातील विकासकामे रखडली आहेत. त्यांच्या कृत्यामुळे गावाची बदनामी होत आहे. शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी; अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, ग्रामसेवक युवराज वायळ यांना पेसा अंतर्गत कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी महिनाभर उलटूनही पर्यायी ग्रामसेवकाची नियुक्ती झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने विविध शासकीय दाखले मिळवताना ग्रामस्थांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. घरकुल योजना, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, वैयक्तिक दाखले तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी नागरिकांना ग्रामपंचायतीत हेलपाटे मारावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पेसा आणि वित्त आयोगाचा निधी खर्चाविना

नोव्हेंबर 2025 पासून सरपंच ग्रामपंचायतीत उपस्थित नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे मासिक सभा आणि ग्रामसभा नियमित होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, 15व्या वित्त आयोगाचा सुमारे 8 लाख 41 हजार रुपयांचा निधी अद्याप खर्चाविना आहे. पेसा निधीच्या वापराबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी गावातील मूलभूत विकासकामे रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निधी वेळेत खर्च न झाल्यास तो परत जाण्याची शक्यता असल्याने गावाच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सरपंचांकडून पैसे घेतल्याचा आरोप; पोलिसांकडे तक्रारी

ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत सरपंच शिपाई बाळू भांगरे यांच्याशी संपर्क साधत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच शासकीय योजना आणि सरपंच परिषदेच्या नावाखाली काही व्यक्तींकडून पैसे घेतल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.

सरपंचाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

दरम्यान, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, घरघंटी आदी वस्तू देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून योगेश ऊर्फ रामा भांगरे यांच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका फिर्यादीकडून सुमारे 79 हजार 600 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याशिवाय गावातील सुमारे 50 व्यक्तींचीही फसवणूक झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या दाव्यांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, सरपंच योगेश भांगरे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.

आणखी तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्काचे आवाहन

राजूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले की, योगेश भांगरे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असून आणखी नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारची तक्रार असलेल्या नागरिकांनी राजूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आरोग्य केंद्र आणि शैक्षणिक संस्थांवरही परिणाम?

एकदरे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आश्रमशाळा आणि माध्यमिक विद्यालयाशी संबंधित काही समित्यांमध्ये सरपंच पदाची भूमिका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरपंचांच्या अनुपस्थितीचा परिणाम या संस्थांच्या कामकाजावरही होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून ग्रामस्थांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT