BJP Mumbai joining event : भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात 'ऑपरेशन लोटस'ला अकोले तालुक्यातून सुरूवात केली. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिता भांगरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घडवून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.
दरम्यानच्या काळात मंत्री विखे पाटील आणि भांगरे कुटुंबियांमध्ये गाठीभेटी झाल्या होत्या. त्यावरून भांगरे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखवी असल्याने भाजपने त्याअनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय गणित आखण्यास सुरूवात केली आहे.
दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरात (Sangamner) मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. लवकरच 'ऑपरेशन लोटस' होणार असे सूचक वक्तव्य करून एकप्रकारे राजकीय धक्कातंत्राचे संकेत दिले होते.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार वैभव पिचड यांच्या मध्यस्थीने सुनिता भांगरे यांनी मंत्री विखे पाटील यांची दिवाळीत भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पिचड आणि भांगरे यांच्यात मंत्री विखे पाटील यांनी योग्य समन्वय साधून अकोले तालुक्यातूनच राजकीय धक्कातंत्राला सुरूवात केली आहे.
मुंबई इथल्या भाजप च्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती भांगरे, दिलीप भांगरे यांच्यासह अकोले तालुक्यातील काही गावांचे सरपंच आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, जेष्ठ नेते सीताराम भांगरे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे, विनायकराव देशमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी स्वागत करताना तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही देत 'सबक साथ सबका विकास', या मंत्राने अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चांगले काम सुरू ठेवू. आपण आपल्या भागात चांगले काम करून पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी काम कराल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
मंत्री विखे पाटील यांनी भांगरे परिवाराने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल कौतुक केले. अकोले तालुका संपूर्ण भाजपमय करण्यासाठी हा पक्ष प्रवेश महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून अकोले तालुका शत प्रतिशत भाजप करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने भांगरे यांचा प्रवेश महत्वपूर्ण असून तालुक्यातील सर्व गट आणि गणात भाजपचे उमेदवार विजयी करण्याची आता रणनीती आखली जाईल, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.