Kiran Lahamate, Amit Bhangare, Vaibhav Pichad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Akole Politcs : नगरच्या अकोल्यात तिरंगी लढत होणार? असं आहे राजकीय गणित...

Sunil Balasaheb Dhumal

Ahmednagar Political News : महायुती आणि महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी ज्याचा आमदार त्याचा उमेदवार हे पहिले सूत्र असणार आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील अकोला विधानसभा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे असणार आहे.

यामुळे महायुतीतील भाजपमधील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचे दिसते. मात्र उमेदवारी मिळो अगर न मिळो आपण निवडणूक लढायचीच, असे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे अकोल्यातून तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अकोले मतदारसंघात अजित पवार गटाचे किरण लहामटे Kiran Lahamte आमदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये भाजपचे वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यानंतर राज्यातील राजकीय स्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. सध्या अजित पवार गट आणि भाजप महायुतीत आहेत.

आता विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच महायुतीत उमेदवारीवरून वाद सुरू झालेले दिसते. सूत्रानुसार ही जागा अजित पवार गटाकडे जाणार असली तरी त्यावर भाजपच्या वैभव पिचड यांनी दावा ठोकला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने अकोल्यातून अमित भांगरे Amit Bhangre या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यांच्यासाठी पवारांनी अकोल्यात सभा घेऊन अमितला साथ देण्याचे आवाहनही केले आहे. आघाडीकडून अमित भांगरेंची उमेदवारी निश्चित झाली असतानाच महायुतीत मात्र उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. येथून अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. त्यातच वैभव पिचड यांनीही शड्डू ठोकला आहे.

वैभव पिचड Vibhav Pichad हे राष्ट्रवादीकडून 2014 ते 2019 या काळात आमदार होते. २०१९ मध्ये पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून अशोकराव भांगरे इच्छुक होते. मात्र त्यांना थांबवून शरद पवारांनी किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि भांगरेंनी त्यांचा प्रचार केला. आता लहामटे हे महायुतीतील अजित पवार गटासोबत आहेत.

त्यामुळे शरद पवार गटाने अशोकराव भांगरे यांच्या चिरंजीव अमित यांना संधी दिली आहे. आता भाजपमध्ये बंडखोरी झाली तर अकोले येथे माजी आमदार वैभव पिचड, अजित पवार गटाचे किरण लहामटे आणि शरद पवार गटाचे अमित भांगरे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT