BJP Flags
BJP Flags Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

लतादीदींच्या कार्यक्रमात पैशांच्या मागणीने भाजपमध्ये रंगलाय वाद!

Sampat Devgire

नाशिक : राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांतील वाद नवे नाहीत. मात्र त्याला काही मर्यादा असतात. येथील सिडको (Nashik) भागातील भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांच्या वादाने या मर्यादा देखील पार केल्या आहेत. लतादीदींच्या (Lata Mangeshkar) श्रद्धांजलीपर कार्यक्रमासाठी पैसे जमा करण्यावरूनच त्यांच्यात वाद सुरु झाला. परस्परांवर आरोपही झाले. त्यात एका गटाने कार्यक्रम होऊ द्यायचा नाही अशी भूमिका घेतल्याने हा वाद चर्चेचा विषय बनला आहे.

भारतरत्न व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ऑर्केस्ट्रासाठी पैसै गोळा करण्यावरून भाजपमध्ये दोन गट निर्माण होऊन त्याचे रूपांतर वादात झाल्याचे बघायला मिळाले. यावरून सध्या हा विषय सिडको परिसरात नागरिकांसाठी मोठा चर्चेचा ठरू पाहत आहे.

नुकतेच भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने बहुतांश ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता भाजपच्या एका गटाने सिडको परिसरात श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करून त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाची संकल्पना पुढे आणण्यात आली. त्याकरिता पैशांची जमवाजमव करण्याचे ठरले. परंतु, त्यास एका गटाने तीव्र आक्षेप नोंदविला. श्रद्धांजलीपर कार्यक्रमात ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यापेक्षा तेथे दिव्यांग बांधवांना उपयोगी व गरजेच्या वस्तू देण्यात याव्यात, असे सुचविण्यात आले. यावरून भाजपमध्ये मतभेद निर्माण होऊन दोन गट पडले. त्यात त्यांची तू तू - मैं मैं देखील झाली. सध्या हा वाद चव्हाट्यावर आल्याने सिडको परिसरात या विषयाच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

(स्व.) लतादीदींच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमानिमित्त जवळपास लाखभर रुपये जमविण्याचे ठरले. त्यात प्रत्येकास पंधरा हजार रुपये वाट्याला आले. कार्यक्रमात ऑर्केस्ट्रापेक्षा दिव्यांगांना वस्तू दिल्यास ते अधिक सयुक्तिक ठरेल, असा विचार मांडण्यात आला. पण त्यास समोरच्या गटाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होऊ देणार नाही.

- बाळासाहेब घुगे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप दिव्यांग आघाडी

---

(स्व.) लता मंगेशकर यांच्या देशभक्तिपर व सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे. याकरिता पक्षश्रेष्ठी व पोलिसांची परवानगी घेण्यात आली आहे. बहुतांश जणांनी यासाठी सहमती दर्शविली आहे.

- हर्षदा फिरोदिया, सरचिटणीस, भाजप शहर महिला आघाडी

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT