Ambadas Danve Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ambadas Danve: अमित शहांचे मुंबईप्रेम हे बेगडी आहे

बुलेटट्रेनऐवजी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिस्थिती समजून घेण्याचा सल्ला

Sampat Devgire

नाशिक : मुंबईची (Mumbai) सरकारी व इतर अनुषंगिक कार्यालय राजधानी दिल्लीत (New Delhi) हलवली असती तर हे समजता आले असते परंतु, मुंबईतील महत्त्वाचे कार्यालय अहमदाबादला (Ahemdabad) हलवून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव अमित शहा (Amit Shaha) व त्यांच्या भाजपचा (BJP) असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. (Amit shaha wants to reduce the importance of Mumbai)

सिन्नर तालुक्यात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्या पार्श्वभूमीवर श्री. दानवे सिन्नर दौऱ्यावर आले. त्यापूर्वी नाशिक येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना भाजप व अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर त्यांनी टीका केली. मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सांगत असले तरी, यामागे मुंबईवरचे बेगडी प्रेम ते दाखवित आहेत. मुंबईतील अनेक कार्यालय अहमदाबादला हलवून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.

मुंबईतील कार्यालय दिल्लीला हलवली असती तर एक वेळ ते समजता आले असते, परंतु ती कार्यालय अहमदाबादला हलविली जात असल्याने मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्र हा आतापर्यंत सोशिक राहिला आहे. कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र त्यावर मात करेल असा दावा दानवे यांनी करताना गृहमंत्री अमित शहा यांनी बुलेट ट्रेनच्या कामासाठी मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या वावरात जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घ्यावी असा शाब्दिक टोला लगावला.

राज्यपालांच्या तत्परतेवर भूमिका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी दिली होती. ती यादी जाहीर करताना अनेक कारणे दिली, टाळाटाळ केली. त्यासाठी अडीच ते तीन वर्ष वाट पहावी लागली, मात्र शिंदे-फडणीस सरकारच्या काळात प्रलंबित १२ आमदारांच्या यादीवर दोन ते तीन मिनिटात निर्णय घेतले जात असल्याने राज्यपालांच्या या तत्परतेवर लवकरच भूमिका स्पष्ट करू असे दानवे म्हणाले. भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका करतांना पेंग्विन्स सेना असे संबोधले त्याला प्रतिउत्तर देताना दानवे यांनी शिवसेना कोणती व कशी सेना आहे ही निवडणुकीच्या मैदानात स्पष्ट होईल. आशिष शेलार यांच्यासह सर्व विरोधकांना शिवसेनेची ताकद दाखवून देऊ असे आव्हान दिले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT