Dr. Amol Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amol Kolhe : 'मान खाली घालून गद्दारांबरोबर जाणं मनाला पटलं नाही, त्यामुळं...' ; अमोल कोल्हे थेट बोलले!

Nationalist Congress Party News : 'आता पालख्या वाहणारे पालखीत बसणार आहेत आणि..', असंही अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितलं.

Pradeep Pendhare

Shirdi News : 'महाराष्ट्राचे अस्मिता असलेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका टीव्हीवर साकारतो. मान खाली घालून गद्दारांबरोबर जाणे हे मनाला पटले नाही. त्यामुळे संघर्ष निवडला. निष्ठा निवडली आणि दबावा पुढे झुकणार नाही, असे ठरवले", असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

भाजपपेक्षा महाविकास आघाडी, इंडिया आघाडीकडे सर्वाधिक मतं आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या घोषणाबाजी करत आहे. यात "अबकी बार 400 पार", ही त्यातलीच एक घोषणा आहे. भाजपला देखील माहित आहे, आपली सत्ता येणार नाही. त्यामुळे अशा घोषणा करत असल्याचेही खासदार कोल्हे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी 'ज्योत निष्ठेची लोकशाही संरक्षणाची', या अंतर्गत कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संवाद साधत आहेत. या संवादाला दोन्ही बाजूनेही प्रतिसाद मिळत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी या अधिवेशनात तडाखेबाज भाषण केले.

खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) म्हणाले, 'दिल्लीत महाराष्ट्राची अस्मिता कोणी जपली असेल, तर ती शरद पवार यांनी जपली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात त्यांचे नाव आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला राष्ट्रवादी हवी होती. त्यात यश न आल्याने राष्ट्रवादी फोडली आणि आमच्यातले गद्दार तिकडे गेले, ते बरे झाले गेले. आता पालख्या वाहणारे पालखीत बसणार आहेत आणि त्यांना कोणी रोखणार नाही.'

याशिवाय 'भगवा हा कोणाची मक्तेदारी नाही. हा शिवरायांचा भगवा आह. भिक्खूंचा भगवा आहे. तिरंग्यामधील भगवा आहे. राम जेवढा तुमच्यात आहे, त्यापेक्षा जास्त राम आमच्यामध्ये आहे. आम्ही राम-राम म्हणत लोकांना जोडतो. आम्हाला धनुष्य ताणलेला राम नको, तर आशीर्वाद देणारा राम हवा आहे. परंतु भाजपने रामात देखील चुनवी जुमलेबाजी शोधली आहे.' असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

हा फक्त एक 'चुनावी जुमला' -

तर महिला कुस्तीपटूंचा संदर्भ देत महिलांचे शोषण करणाऱ्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना राम कसा पावणार? असा सवाल करत खासदार अमोल कोल्हे यांनी कलियुगातील रामायण सांगितले. आमदार फोडणे, पक्ष फोडणे, पक्षचिन्ह पळवणे, खोके वाटणे, अशांना आता राम हवा आहे. हा फक्त एक 'चुनावी जुमला' आहे. त्यापासून सावध राहा आणि जनतेला देखील सावध करा, असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले.

भाजपला केंद्रात सत्ता टिकवण्यासाठी महाराष्ट्र हवा -

भाजपची(BJP) एक घोषणा आहे, ती म्हणजे "अबकी बार 400 पार", परंतु ती फक्त एक घोषणा आहे. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवणारी ती घोषणा आहे. भाजप आणि मित्र पक्षांकडे आज 38 टक्के मतदान आहे आणि महाविकास आघाडीकडे 62 टक्के मतदान आहे. त्यामुळे भाजप घाबरलेले आहे. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि ते टिकून ठेवण्यासाठी भाजप जाहिरात आणि अशा घोषणाबाजींवर प्रचंड खर्च करत आहे. तसेच भाजपला केंद्रात सत्ता टिकवण्यासाठी महाराष्ट्र हवा आहे. यातूनच महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले गेल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी केला.

भाजप, शिंदे आणि मित्र मंडळाचे खासदार मौनी!

महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे(Eknath shinde) आणि मित्र मंडळ (अजित पवार गट) यांच्याकडे 48 पैकी 39 खासदार आहेत. परंतु एकानेही महाराष्ट्राच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवला नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले जात असताना बोलले नाही. त्यामुळे भाजप महायुतीला हे खासदार निवडून येतील का नाही, असा देखील प्रश्न भाजपला पडला आहे. म्हणून 2024 ला या खासदारांना पुन्हा संसदेत पाठवायचे की नाही? असा प्रश्न भाजप महायुतीला पडला आहे, अशी देखील टीका खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT