Anna Hajare
Anna Hajare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

...तर हजारेंच्या समोरच द्राक्ष उत्पादक शेतकरीही उपोषण करणार होते!

Sampat Devgire

नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी वाइन (Wine) विक्रीच्या निर्णयाविरोधात उपोषणाची घोषणा केली होती. त्यांनी एकदा निर्णय जाहीर केला, की ते शक्यतो माघार घेत नाहीत. मात्र वाइन म्हणजे दारू नव्हे. केंद्राने वाइनला (Centre Government) प्रक्रीयायुक्त अन्न असा दर्जा दिला आहे. वाइन आणि दारू यातील फरक समजून घ्या, असा इशारा थेट हजारेंशी चर्चा करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिला होता.

द्राक्ष बागाईतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, माजी अध्यक्ष रवींद्र बोराडे, रावसाहेब रायते, विजय घुमरे, राजेंद्र सोनवणे, शेखर होळकर आदी राळेगणसिद्धीमध्ये उपस्थित होते. संघाचे नेते कैलास भोसले यांनी अण्णा हजारेंना प्रश्न समजून घ्या. द्राक्षासवमध्ये वाइन एव्हढेच अल्कोहोल आहे. त्यामुळे तुम्ही उपोषण केल्यास आम्हीही पाचशे द्राक्ष शेतकरी तुमच्या समोरच व विरोधात उपोषण करू, असा इशारा दिला होता. तेव्हा महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह सांगली, सोलापूर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक होते. अशी माहिती श्री. भोसले यांनी `सरकारनामा`ला दिली.

राज्य सरकारने वाइन सुपर मार्केट, मॉलमध्ये विक्रीसंबंधी काही नियम घालून परवानगी दिली आहे. त्याचे संघाने समर्थन केले आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, की राज्यात दर वर्षी देशी मद्य ३६ कोटी लिटर, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य २२ कोटी लिटर, बिअर ३० कोटी लिटर अशी एकूण ८८ कोटी लिटरची विक्री होते. वाइनची विक्री मात्र ७५ लाख लिटर इतकी आहे. शिवाय देशी मद्य ४० ते ५० रुपयांना आणि वाइन ४०० ते ५०० रुपयांना विकत मिळत असल्याने देशी मद्यपी हे वाइन विकत घेऊ शकत नाहीत. त्याचवेळी मर्यादित व नियमित वाइन सेवनचे आरोग्यदायी असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. त्यामुळे मद्याची आणि वाइनची तुलना करणे अयोग्य आहे. वाइन उत्पादन द्राक्षांपासून प्रक्रिया करून होते. केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगांसाठी सबसिडी देते. या साऱ्या बाबींचे निवेदन श्री. हजारे यांना संघातर्फे देण्यात आले. याशिवाय श्री. हजारे यांनी ९० दिवसांचा दिलेला वेळ स्वागतार्ह आहे.

राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन

या संदर्भात द्राक्ष उत्पादक संघाचे श्री. भोसले म्हणाले, की जगामध्ये इसवी सन पूर्व सहा हजारपासून इटली, फ्रान्स, अमेरिका, अर्जेंटिना वाइन उत्पादनात अग्रेसर आहे. वाइन ‘फर्मेन्टेशन’ने तयार होत असल्याने फळाचे पोषणमूल्य आणि औषधी गुण टिकून राहतात. त्यामुळे वाइन हे अन्न आणि औषधी आहे. रेड वाइनमुळे पचनशक्ती मजबूत होते. पोटातील बॅक्टेरियाचा नायनाट होतो. पोटातील अल्सर कमी होण्यास मदत होते. रेड वाइन रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवर गुणकारी आहे. वाइन पाक प्रक्रियेत आणि स्वयंपाकात चवीसाठी वापरली जाते असे अनेक फायदे सांगता येतील.

वाइन उद्योगाचा विस्तार करणार

देशात फळांवर दहा टक्क्यांच्या आत प्रक्रिया होते. परदेशात हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आहे. राज्य सरकारच्या वाइन विक्रीच्या धोरणामुळे शेतमालाचे मूल्यवर्धन होऊन ग्रामविकासाला चालना मिळेल. रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला मदत होईल. देशातील वाइन उद्योग एक हजार कोटींवरून पाच हजार कोटींपर्यंत नेण्याचा मानस आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, की गोवा आणि मध्य प्रदेशात बेरी फळाच्या वाइन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मागेल त्याला होमडिलिव्हरी’ सेवा दिली जात आहे. ही सारी परिस्थिती पाहता, महाराष्ट्र मद्यराष्ट्र होईल, असा आरोप करणे चुकीचे आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT