Anna Hazare on Arvind Kejriwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anna Hazare on Arvind Kejriwal : अरविंद आता दूर गेलाय; 90व्या वाढदिवशी अण्णांची प्रतिक्रिया चर्चेत, अरविंद केजरीवाल यांना टोला?

On his 90th birthday, Anna Hazare one-line remark about Arvind Kejriwal has reignited discussion over their once-powerful anti-corruption alliance : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

Pradeep Pendhare

Anna Hazare 90th Birthday : देशभरात भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा चेहरा ठरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

मात्र या शुभेच्छांच्या पार्श्वभूमीवर एकेकाळचे जवळचे सहकारी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपर्क साधला का, असा प्रश्न विचारताच अण्णांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “अरविंद आता दूर गेलाय…” एवढ्याच शब्दांत अण्णांनी प्रतिक्रिया देत जुन्या नात्यातील दुरावा स्पष्ट केला.

2012 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात उभारलेल्या जनआंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. या आंदोलनात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मनीष सिसोदिया हे अण्णांचे प्रमुख सहकारी म्हणून पुढे आले होते. याच आंदोलनातून पुढे राजकारणात उतरण्याचा निर्णय घेत त्यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि दिल्लीची सत्ता मिळवली.

मात्र अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी वेळोवेळी केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या राजकीय भूमिकांवर उघड नाराजी व्यक्त केली. कथित दारू परवाना घोटाळा प्रकरणात केजरीवाल आणि सिसोदिया यांना तुरुंगात जावे लागल्यानंतरही अण्णांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती.

दरम्यान, अलीकडेच पंजाबमधील राजकीय घडामोडी आणि आम आदमी पार्टीमधील अंतर्गत फुटीवर बोलताना अण्णांनी अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वालाच जबाबदार धरले होते. “केवळ स्वार्थासाठी पक्ष बदलणे चुकीचे आहे. राजकारणाचा मुख्य उद्देश सेवा असायला हवा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अण्णांशी संवाद साधला. तुम्हाला आता शतक पूर्ण करायचे आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळे राज्याची प्रगती होत आहे, असे म्हणत शिंदे यांनी अण्णांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. यावर अण्णांनीही आशीर्वाद देताना, तुम्हीही शंभरी पूर्ण करा आणि जनतेची प्रामाणिक सेवा करत राहा, असा संदेश दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोनवर शुभेच्छा देताना राज्यात पुढील महिनाभरात लोकायुक्त कायदा लागू करण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती अण्णांनी दिली. राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, सर्वांचे लक्ष मात्र एका प्रश्नाकडे लागले होते, अरविंद केजरीवाल यांनी फोन केला का? अण्णांच्या एका वाक्यानेच त्याचे उत्तर दिले, “अरविंद आता दूर गेलाय.”

यावेळी अण्णा हजारे यांनी राजकारण्यांना संदेश देताना म्हटले, पक्ष आणि निवडणुका असतीलच, पण सेवाभाव हरवला तर मतभेद निर्माण होतात. राजकारणाचा खरा उद्देश जनसेवा आहे. माझा सर्व राजकारण्यांना एकच संदेश आहे, सेवाभाव जपा. अण्णांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा जुने अण्णा-केजरीवाल समीकरण आणि त्यातील दुरावा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT