Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yeola Bazar Samiti : छगन भुजबळांची विधानसभेची रंगीत तालमी यशस्वी!

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : निवडणूक येवला बाजार समितीची असली तरी माहोल मात्र विधानसभा निवडणुकीचा होता. किंबहुना आरोप-प्रत्यारोप आणि आव्हान-प्रतिआव्हान थेट विधानसभेच्या उमेदवारीपर्यंत गेले होते. विधानसभा निवडणुकीचा पहिला अंक मानल्या गेलेल्या या निवडणुकीच्या निकालातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पहिल्या अंकात बाजी मारली आहे. बेरजेच्या राजकारणात भुजबळ आजही प्लस मध्येच आहेत. या निकालाने विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. (APMC eletions became a trial ob assembly election)

येवला (Yeola) बाजार समितीच्या निवडणुकीच्या (APMC election) निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवला मतदारसंघातील डोईजड विरोधकांना घरी बसवले. त्यांनी शिवसेनेला (Shivsena) बरोबर घेतले मा६ सोयीने. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीतून विधानसभा निवडणुकीची चाचपणी झाली. त्यात भुजबळ यांनी आपली बाजू भक्कम केली.

येथील राजकारणात आजही माजी आमदार मारोतराव पवार व युवा नेते संभाजी पवार, आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे, सहकार नेते अंबादास बनकर आणि ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे या चार गटाचे वलय आहे.प्रत्येकाची स्वतंत्र ताकद ओळखून भुजबळांना २००४ च्या निवडणुकीपासून कुणाला ना कुणाला आपल्या सोबत ठेवण्यात यश आले आहे. २०१९ पासून फक्त बनकरच सोबत असले तरी भुजबळांनी मागील विधानसभेत विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला होता. मागील विधानसभा निवडणुकीतच पवार-दराडे -शिंदे एकत्र आल्याने वेगळ्या निकालाची चाहूल लागली होती पण तसे काही घडले नाही.

आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत हे तिघे एकत्र राहिले असते तर नक्कीच राजकीय पटलावर आखाडा चांगलाच रंगला असता. मात्र तत्पूर्वीच भुजबळांचे येथील जबाबदारी असलेले नेते दिलीप खैरे यांच्या माध्यमातून गेल्या वर्ष-दोन वर्षापासून संभाजी पवारांना आपलेसे करण्याचे सुरू असलेले प्रयत्न मजूर फेडरेशन व बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने यशस्वी झाले.

बेरजेचे राजकारण भुजबळ यांच्या पथ्यावर पडले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत बनकर व पवार यांना सन्मानजनक जागा देऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी देत भुजबळांनी अगोदरच अर्धी लढाई जिंकली होती. त्यातच समोर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे व भाजपची पॅनल निर्मितीसाठी मोठी जुळवाजुळवा झाल्याने सुरवातीला एकतर्फीच निकाल लागणार असे बोलले जात होते. मात्र शेवटी निवडणुकीत वेगवेगळ्या कारणाने रंगत भरली पण निकाल मात्र बदलला नाही.

आरोप प्रत्यारोपांमुळे चुरस!

मतदारसंघातील विविध विकासकामे तसेच २०२४ ला उमेदवारीच्या शक्यतेने गेल्या दोन-अडीच वर्षापासून भुजबळ व दराडे यांच्या संबंधात माशी शिंकली आहे. त्यातच दराडे बंधूनी सुरवातीला बाजार समितीच्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र संवाद मेळाव्यात भुजबळ यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात दराडेंवर जोरदार टीकास्त्र केले आणि ही टीका अंगावर घेत निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरत रंगत वाढविली. अर्थात २०१९ मध्ये माणिकराव शिंदे यांनी आम्हीच भुजबळ यांना घालवणार हे काढलेले उद्गार यावेळी कोटमगाव येथे प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आमदार नरेंद्र दराडे यांनी काढले आणि येथूनच पुन्हा-आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला.

विधानसभेला माझ्या विरोधात उमेदवारी कराच असे थेट आव्हानच भुजबळांनी दिले आणि कुणाल दराडे यांनी हे आव्हान स्वीकारून उद्धव ठाकरेनी आदेश दिल्यास उमेदवारी करणारच असे प्रत्युत्तर दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली किंबहुना दोन्ही बाजूने सुकडी, पैठणीचा पाऊसही पडल्याने निकालाचा अंदाज लावणे कठीण झाले होते, मात्र भुजबळांसह पवार-बनकर यांची हक्काची एकगठ्ठा मते असल्याने निकालात फारसा बदल झाला नाही.

आता लक्ष आगामी निवडणुका

दोन्ही बाजूंनी बाजार समितीच्या निवडणुकीतून विधानसभेचे रणसिंग फुंकले खरे पण अजून जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक होणार आहेत. त्यासाठी दोन्ही गट आत्ताच टिळा लावून तयार आहेत, भुजबळांची बाजू वरचढ आहे. त्यामुळे विरोधकांना निवडणूक हलक्यात घेणे परवडणारे नाही हाही संदेश या निकालाने दिला आहे हे नक्की!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT