Anil Patil
Anil Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amalner APMC Election : दमदार महाविकास आघाडीमुळे भाजपवर चिंतनाची वेळ!

Sampat Devgire

Bazar Samit Result : बाजार समितीच्या निवडणुकीतील दणदणीत विजयाने महाविकास आघाडीची एकी तर भाजपच्या वेगवेगळ्या गटांची झालेली वाताहत प्रकर्षाने दिसून आली. विधानसभा, जिल्हा बँक, दूध संघ आणि आता बाजार समितीच्या विजयाच्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघावर घट्ट पकड बसविली असताना विरोधक मात्र अजूनही विखुरलेलेच दिसताय. बाजार समितीतील विजयाने महाविकास आघाडीला ‘बूस्टर डोस’ मिळाला. (APMC result given Booster political dose to Mahavikas Aghadi)

अंमळनेर बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) आमदार अनिल पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या पॅनलने लक्षणीय विजय संपादन केला. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उत्साह वाढला आहे. दुसरीकडे सत्तेच्या राजकारणात हरवलेला भाजप (BJP) विस्कळीत झाल्याचे चित्र पुढे आहे.

या निकालानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर अमळनेर भाजपवर चिंतन शिबिर आयोजित करण्याची वेळ आली आहे.

अमळनेर बाजार समितीच्या निवडणुकीने तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण दिले असून, महाविकास आघाडीची त्यातल्या त्यात आमदार अनिल पाटील यांची मतदारसंघावरील घट्ट झालेली पकड दिसून येते. त्यांना मिळालेली माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची साथ महत्त्वाची ठरली. प्रचारात घेतलेली आघाडी, निवडणुकीचे योग्य नियोजन, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची फळी या आणि इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याने महाविकास आघाडीचा विजय सुकर झाला.

दुसऱ्या बाजूला भाजपच्या वेगवेगळ्या गटांना शेवटपर्यंत आपण एक आहोत, हेच मतदारांना पटविता आले नाही. माजी आमदार स्मिता वाघ व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गटांची झालेली युती तालुक्यातील शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना रुचली नाही. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील पॅनलचे प्रमुख असून देखील अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत होते तर भाजपच्या नेत्या ॲड. ललिता पाटील यांना डावलल्यामुळे त्यांनी आधीपासूनच वेगळी चूल मांडलेली होती. यामुळे देखील भाजप पुरस्कृत पॅनलला पराभव पत्करावा लागला.

दिग्गजांचा पराभव

अमळनेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, माजी संचालक पराग पाटील, महेश देशमुख, रामकृष्ण पाटील, माजी उपसभापती पद्माकर गोसावी, माजी नगरसेविका पती दीपक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांचे स्वीय सहाय्यक गुलाब आगळे या दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. यातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांचा पराभव काँग्रेसमुळेच झाल्याची मतदारसंघात चर्चा आहे.

त्यांना पॅनलमध्ये घेऊ नये, येथपासून ते त्यांचा पराभव व्हावा, यासाठी काँग्रेसची एक टीम सक्रिय होती. त्यांनीच अपक्ष उमेदवार नितीन पाटील यांना रसद पुरविल्याची चर्चा आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील यांचे सुपुत्र व माजी संचालक पराग पाटील यांचा पराभव त्यांच्यासाठी धक्कादायक आहे. आर्थिक दुर्बल मतदारसंघातील भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीकडून देखील काही मतांची तजवीज केली गेल्याची चर्चा आहे.

ज्येष्ठांसह तरुणांची एन्ट्री

बाजार समितीत ज्येष्ठांसोबत तरुणांची देखील एन्ट्री झाली आहे. यात माजी आमदार स्मिता वाघ, प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, डॉ. अशोक पाटील, भोजमल पाटील या ज्येष्ठांसोबत सचिन पाटील, हिरालाल पाटील, प्रफुल पाटील, अशोक आधार पाटील, नितीन पाटील, समाधान धनगर या तरुण फळीचा झालेला विजय तालुक्याच्या तरुणांसाठी आशादायी आहे.

पक्षीय बलाबल असे...

बाजार समितीतील पक्षीय व गटांचे बलाबल : राष्ट्रवादी-९, काँग्रेस-५, स्मिता वाघ गट :३, शिरीष चौधरी गट :१ असे आहे. महाविकास आघाडीकडून प्रा. सुभाष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे व अशोक आधार पाटील यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. प्रा. सुभाष पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे तालुक्याच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर तसेच येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर देखील परिणाम होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT