BJP MLA Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर भाजपचे शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींमुळे...

BJP MLA Ram Shinde : नेते पक्ष का सोडताहेत याचं काँग्रेसनं आत्मचिंतन करावं, आमदार शिंदे यांचा सल्ला

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News :

अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अशोक चव्हाणांच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच भाजपचे आमदार राम शिंदे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळे भाजपचा प्रवाह तयार झाला आहे. जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे. 'काँग्रेसचे नेते आपल्या पक्षाला का सोडून जात आहेत? याचे काँग्रेसने आत्मचिंतन करावे,' असा सल्ला माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर आमदार राम शिंदे यांनी राज्यातील सद्यःस्थितीवर भाष्य केले.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या वकील मंडळींच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळेस थोरात यांनी 'केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावातून विरोधी पक्षाचे नेते फोडण्याचे काम भाजपकडून सुरू आहे,' असा आरोप केला होता.

याकडे लक्ष वेधले असता भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, 'आमदार बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्यापेक्षा मी लहान आहे. मात्र, काँग्रेस पक्षातील नेते पक्ष सोडून जात असतील, तर त्याबाबत काँग्रेस (Congress) पक्षाने आणि नेतेमंडळींनी आत्मचिंतन करावे,' असा सल्ला आमदार शिंदे यांनी दिला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार का, याबाबत लक्ष वेधले असता आमदार राम शिंदे म्हणाले, 'लोक नेहमी प्रवाहच्या सोबत राहतात. पूर्वीच्या काळी भाजपला कोणी जवळ करीत नव्हते. भाजपला नावे ठेवणारेच आता भाजप पक्ष प्रवेशाच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत'. राजकारणात काहीही होऊ शकते. पाच वर्षांत राज्यात सर्वच पक्ष सत्तेवर येऊन गेले. सध्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते, असेही आमदार शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आमदार राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठकीमध्ये सीना धरणातून आवर्तन सोडण्याच्या मुद्द्यावरून प्रश्‍नांची सरबत्ती करत जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जयंत देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. सीना धरणातून आवर्तन सोडण्यास दिरंगाई केल्याने देशमुखांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर पालकमंत्री विखे यांनी सीना धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले.

दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई

निमगाव गांगर्डा (ता. कर्जत) येथे तलाठी कार्यालयासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही, याकडे आमदार राम शिंदे यांनी लक्ष वेधले होते. या दिरंगाईला जे जबाबदार असतील त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT