Nashik News, 22 Mar : भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू केली असता अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी खरातचा नाशिक शहरातील बंगला, कार्यालय आणि सिन्नर येथील घराची झाडाझडती घेतली.
यावेळी त्याच्या घरांतून पिस्तूल, जिवंत काडतुसे, आठ लाखांची रोकड, दोन लॅपटॉप, मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. आता या कागदपत्रांची चौकशी केली असता खरातने त्याच्या पत्नीसह मुलगी आणि नातेवाईकांच्याही नावांवर शेकडो कोटींची माया जमवल्याचं समोर आलं आहे. नाशिक शहरासह सिन्नर, अहिल्यानगरमधील शिर्डी, राहता, निघोज, निमगाव कोऱ्हाळे इत्यादी ठिकाणी त्याची शेकडो कोटींची जमीन आहे.
अशातच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिचं आणि उपजिल्हाधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीचं नाव पाथर्डी शिवारातील एक एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यात एकत्रित दिसत आहे. या दोघींच्या नावावर ही जमीन असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे आता प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच खरातसोबत साटेलोटं केल्याचं समोर आलं आहे. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली असून खरातचे धागेदोरे आणखी कुठंपर्यंत आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी शिवारातील एक एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यात खरातच्या मुलीसोबत सध्या ठाणे येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीचे नाव देखील आहे. हा अधिकारी पूर्वी नाशिकमध्ये कार्यरत होता. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्याने खरातशी भागीदारी करीत जमीन खरेदी केल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, खरात भोंदुगिरीसह जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करायचा. आतापर्यंत त्याच्या मालमत्तेचे ६० हून अधिक सातबारे समोर आलेत. त्याचा शहरातील कर्मयोगीनगर भागात अलिशान बंगला आहे. तर शरणपूर रोड भागात कार्यालय आहे. यासह सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे खरातने ईशानेश्वर मंदिरा शेजारी त्याचे अलिशान फार्म हाऊस आहे. या ठिकाणी त्याची २१ एकर शेतजमीन असल्याचं समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.