Bade Baba Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : खरात बाबाच्या लीला संपत नाही तोच नाशिकमध्ये बडे बाबाची एन्ट्री, अंनिसची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

Bade Baba Nashik : अशोक खरात या भोंदू बाबा महिलांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करत होता. त्याचे एक-एक व्हिडीओ समोर येत आहेत. चौकशी सुरु आहे. असे असताना दुसऱ्या बाबाचे कारनामे समोर आले आहेत.

Ganesh Sonawane

Nashik News : स्वयंघोषित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधातील लैगिंक अत्याचार प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असतानाच, आता नाशिकमध्ये आणखी एका बाबाची एन्ट्री झाली आहे. खरे तर हा बाबा जुनाच आहे पण त्याची एन्ट्री नव्याने झाली आहे असं म्हणावं लागेल.

भोंदूगिरीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या गणेश जयराम जगताप उर्फ बडे बाबा'चे प्रकरण समोर आले असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या बडे बाबावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अंनिसने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची विनंती केली आहे. तसेच १७ डिसेंबर २०२५ रोजी अंनिसने या बाबा विरोधात नाशिक पोलीस आयुक्तांना देखील पत्र दिले होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना या भोंदू गणेश जयराम जगताप उर्फ बडे बाबा व त्याच्या साथीदारांची सखोल चौकशी करण्याची व त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अंनिस'ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेश जयराम जगताप याच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात यापूर्वी भोंदूगिरीसह विविध गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे या भोंदूच्या माध्यमातून सुमारे 55 कोटी रुपये खर्च करून कामाख्या देवीचे मंदिर बांधण्यात आल्याचे समजते. तसेच १९ मार्चपासून या ठिकाणी काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती 'अंनिस'ने दिली आहे.

भोंदूगिरी करून समाजातील लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर जादू‌टोणाविरोधी कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी अंनिसकडून करण्यात आली आहे.

या बाबाने तंत्र-मंत्र, तांत्रिक विधीच्या माध्यमातून जमिनीत पुरलेला सोन्याच्या हंड्यांचा खजिना काढून देण्याचे आमिष दाखवत तसेच पीडित महिलेच्या पतीचे दारुचे व्यसन सोडवण्याच्या बहाण्याने तब्बल १५ वर्षे महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गणेश जयराम जगताप उर्फ बडे बाबा याच्यावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात बलात्कार, फसवणूक व ॲट्रॉसिटीसह अनेक कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबधित महिलेचे तसेच पतीचे आणि मुलांची नावे लिहिलेले एक 'तांत्रिक पुस्तक' दाखवत "संबंध ठेवले नाही, तर या नावांपैकी कोणाचा तरी बळी जाईल" अशी भीती दाखवून संशयित भोंदू बाबाने महिलेचे शारीरिक शोषण केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

नाशिकच्या पाथर्डी गावाजवळ भवानीमाता परिसरात एका आलिशान बंगल्यात 'बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट'च्या नावाने संस्था काढून संशयिताने स्वतःला मांत्रिक म्हणून सादर केले. पैशांचा पाऊस पाडतो, जमिनीत सोने दडलेले ठिकाण ओळखतो, तांत्रिक पूजा करून खजिना काढून देतो अशा वेगवेगळ्या आमिषांनी त्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. रात्रीच्या वेळी विविध ठिकाणी घेऊन जाऊन शुद्धीकरणासाठी पैशांची मागणी करीत नागरिकांची लाखो-कोटींची फसवणूक केल्याचे समजते.

दरम्यान संशयित बाबाने निफाडमधील धारणगाव येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन कामाख्या देवीचे मंदिर उभारले आहे. २० मार्च ते १८ मार्च या कालावधीत त्याने या मंदिराचा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा कलशारोहण व अखंड हरिनाम सत्पाह ठेवला आहे. धक्कादायक म्हणजे या बाबाने परस्पर या कार्यक्रमासाठी छापलेल्या बॅनरवर त्याने सीएमसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार तसेच नाशिकमधील स्थानिक नेते, नगरसेवकांची नावे लिहून त्यांना प्रमुख अतिथी संबोधले आहे. ते फलक अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT