Ashok Kharat Case : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे अनेक कारनामे उघड होत आहेत. एसआयटीचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासात अशोक खरातकडून होत असलेल्या फसवणुकीचे अनेक प्रकार बाहेर येत असून खरातच्या काळ्या कारनाम्यांची यादी संपायला तयार नाही.
आता खरातचा आणखी एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर हे भोंदूबाबा अशोक खरात याने एका कुटुंबाला मृत्यूची भिती दाखवत कमी किमतीत जमीन हडपून उभारलेले बेकायदेशीर साम्राज्य असल्याची माहिती समोर आली आहे.
मृत्यूची भीती दाखवून तसेच जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी कृत्य करून मोक्याची ही जमिनी अगदी कवडीमोल भावात खरातने लाटल्याचे समोर आले आहे. खरातने १६ लाख रुपये किमतीची जमीन केवळ ४ लाखांत हडपली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या मिरगाव येथील एका कुटुंबाने १९९७ मध्ये १६ लाखांना शेतजमीन घेतली होती. या जमिनीच्या शेजारीच जमीन घेणाऱ्या भोंदू खरातची या जमिनीवर नजर होती. ही जमीन हडपण्यासाठी त्याने कुटिल डाव आखला. जो त्याने २००३ मध्ये यशस्वी देखील केला.
त्याने सदर कुटुंबाला मृत्यूची भिती दाखवली तसेच तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात अनर्थ होईल असे सांगितले. याच दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा गैरफायदा घेत खरातने, 'जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू अटळ आहे अशी भीती त्या कुटुंबाला दाखवली.
मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंब घाबरले होते. त्याचाच फायदा खरातने घ्यायचा ठरवला. खरातने २००३ मध्ये सदर कुटुंबाने १९९७ मध्ये १६ लाखांना घेतलेली जमीन त्याने अवघ्या ४ लाखांत स्वतःच्या आणि पत्नी कल्पना खरातच्या नावावर करून घेतली. पुढे याच जमिनीवर अशोक खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केल्याची बाब समोर आली आहे. (Nashik News)
कुणालाही संशय येऊ नये तसेच कुणी विरोध करू नये म्हणून त्याने मंदिर बांधले. तसेच गरीब शेतकऱ्यांना भीती दाखवून जमिनी लाटताना खरातने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या व्यवहारांवरील सरकारचा महसूलही बुडवल्याचा आरोप त्याच्यावर या भागातील स्थानिकांकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.