Maulana Mufti Ismail & Asif Shaikh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Asif Shaikh Politics: धक्कादायक, `एमआयएम` आमदार मौलाना यांनी ३५ हजार बनावट मतदार नोंदविल्याचा आरोप!

Sampat Devgire

Asif Shaikh News: मालेगाव शहरात विधानसभा निवडणुकीची हवा तापली आहे. माजी आमदार आसिफ शेख यांनी सभांचा धडाका लावला आहे. यावेळी त्यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे प्रशासन देखील चिंतेत आहे.

मालेगाव शहरात यंदा तिरंगी लढतीचे चित्र आहे. विद्यमान आमदार एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्माईल यांना समाजवादी पक्ष आणि अपक्ष माजी आमदार शेख यांसह काँग्रेसचेही मोठे आव्हान आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी आमदार मौलाना मुफ्ती यांनी वेगळीच चाल खेळली आहे.

यामध्ये हैदराबाद कनेक्शन सक्रिय असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगाव मध्य मतदारसंघ बनावट निवडणूक ओळखपत्र आणि बोगस मतदार नोंदणी मुळे चर्चेत आला आहे. याबाबत प्रशासनाने कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर देखील न्यायालयात दावा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात काल झालेल्या जाहीर सभेत माजी आमदार शेख यांनी अतिशय गंभीर आरोप केले. एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवावी. मी या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा आव्हान देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मालेगाव मध्य या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ३५ हजार बनावट मतदार नोंदविल्याचे उघड झाले होते. अनेक बाहेरच्या महिला मतदारांची नावे नोंदवली गेली. बाहेरच्या लोकांनी येऊन या भागात मतदान केले. त्यामुळे मौलाना मुफ्ती निवडून आले, असा दावा माजी आमदार शेख यांनी केला आहे.

त्या निवडणुकीत माझा पराभव केवळ बोगस मतदानामुळे झाला. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. ३६ हजार बनावट मतदारांची नोंदणी झाली आहे. या सर्वांचे बनावट ओळखपत्र तयार करण्यात येत आहे.

या कामात अगदी शिक्षक वर्ग देखील आहे. याबाबत काम करणारे शिक्षक आणि अन्य कार्यकर्त्यांनी ही बनावटगिरी तातडीने थांबवावी. अन्यथा त्यांना जेलमध्ये जावे लागेल. याबाबत आम्ही पोलिस आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघात तीन लाख तीन हजार मतदान होते. अवघ्या दोन महिन्यात हे मतदान तीन लाख ३९ हजार झाले आहे. ३६ हजार मतदार वाढले कसे? त्यासाठी कोण काम करत होते? असे आव्हान माजी आमदार शेख यांनी प्रशासनाला दिले आहे.

मालेगाव मध्य मतदारसंघ पुन्हा एकदा बोगस मतदानासाठी चर्चेत आला आहे. या मतदारसंघात कार्यकर्ते काही रसायनाद्वारे मतदान केलेल्या खुणा पुसतात. पुन्हा पुन्हा मतदान करतात. याबाबत काही महिलांची नावे पाच वेळा, काहींची चार वेळा तर काहींची तीन वेळा नोंदणी झाली आहे. याबाबत प्रशासनाने चौकशी करावी आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, ते सादर केले जातील, असा माजी आमदार शेख यांचा दावा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान आमदार मुफ्ती यांना अपक्ष उमेदवार माजी आमदार शेख यांनी खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच रंगण्याची चिन्हे आहे. त्यापेक्षाही बोगस मतदानावरून निवडणुकीत नवा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT