Maulana Mufti Ismail & Asif Shaikh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Asif Sheikh Politics: मालेगावात लोकसभेला गळ्यात गळा, विधानसभेला धरणार एकमेकांचा गळा

Sampat Devgire

NCP Vs Congress News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावचे राजकारण अतिशय रंजक बनले आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले होते. हा राजकीय एकोपा आता संपुष्टात आला आहे.

मालेगाव मध्य मतदारसंघाची निवडणूक सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आली आहे. यंदाही येथे अतिशय रंगतदार सामने होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी कालपर्यंत एकमेकांची साथ करणारे विधानसभा निवडणुकीसाठी अतिशय टोकाचे आरोप करू लागले आहेत.

यंदाची विधानसभा निवडणूक येथील सर्वच राजकीय नेत्यांसाठी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. या राजकीय अस्तित्वासाठी सर्वच नेत्यांनी एकमेकांवर राजकीय आरोपांचे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात या नेत्यांनी एकमेकांचे जोरदार वस्त्रहरण करण्याचा सपाटा लावला आहे.

मालेगाव शहरात मौलाना मुफ्ती इस्माईल हे एमआयएम पक्षाचे आमदार आहेत. गेल्या पाच वर्षात या पक्षाने सातत्याने सत्ताधारी पक्षाला अनुकूल ठरेल, अशी भूमिका घेतली आहे. राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार मुक्ती इस्माईल यांची चांगलीच 'भरभराट' झाल्याचे बोलले जाते.

दुसरीकडे मालेगाव शहर हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतृत्व करणारे माजी आमदार आसिफ शेख यांनी पक्षाचा याचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा करून त्यांनी आपला सावता सुभा निर्माण केला आहे.

दुसरीकडे एमआयएम आमदार मौलाना मुक्ती हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष एजाज बॅग हे काँग्रेसचे उमेदवार असतील. या गोंधळात आणखी भर घालण्याचे काम समाजवादी पक्षाच्या नेत्या शनेहिंद निहाल अहमद यांनी घातली आहे. त्यादेखील निवडणुकीची तयारी करीत आहेत.

महिनाभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ही सर्व मंडळी हातात हात घालून प्रचारात उतरली होती. मते मागण्यासाठी त्या सर्वांचा एकमेकांच्या गळ्यात गळा होता. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या महिनाभरातच हे सर्व आता एकमेकांचे गळे धरू लागले आहेत.

सर्व इच्छुक उमेदवार एकमेकांवर अतिशय टोकदार आरोप करीत आहेत. त्यामुळे मालेगाव शहराचे राजकीय तापमान अतिशय वेगाने वाढू लागले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक चर्चेची निवडणूक म्हणून मालेगाव शहरातील बहुरंगी लढत ठरण्याची शक्यता आहे.

कालपर्यंत अतिशय प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सध्या कोणीही वाली नाही. माजी आमदार शेख यांनी राजीनामा दिल्याने माजी महापौर हाजी मोहम्मद इस्माईल हे एकमेव नेते या पक्षात आहेत. अशा स्थितीत अल्पसंख्यांकांची मते अनेक गटांत विभागली जाणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी महाविकास आघाडी आणि काँग्रेस या दोघांची अग्नी परीक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

--------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT