Ahilyanagar News : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत पेच कायम राहिला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शेवटपर्यंत 'नॉट रिचेबल' राहिले.
यामुळे या मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, असे दोन उमेदवार, महाविकास आघाडी, मनसे, वंचित, बसपाचे उमेदवारासह 16 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांविरोधात लढताना दिसतील. यात आता कोणाची लॉटरी लागेल, याचा अंदाज देखील राजकीय विश्लेषकांना बांधण अवघड झाल्याची चर्चा आहे.
श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार शेवटपर्यंत जाहीर नव्हता. काँग्रेसने (Congress) इथं विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वेगवान हालचाली केल्या. सुरवातीला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. तिथं चित्र स्पष्ट होईना म्हणून त्यांनी थेट अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार फिक्स होताच, त्यांनी प्रवेश करत 'AB फॉर्म' घेऊन आले. उमेदवारी अर्ज भरला.
आमदार लहू कानडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी 'AB फॉर्म'सह उमेदवारी अर्ज भरला. यामुळे महायुतीत पेच निर्माण झाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवशी काहीतरी तडजोड होईल, असे सांगितले जात होते. परंतु चित्र वेगळेच राहिले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे 'नॉट रिचेबल' राहिले. त्यामुळे महायुतीमधील दोन उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत.
महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली. विद्यमान आमदार लहू कानडे यांचे काँग्रेसने तिकीट कापल्यानंतर युवा नेते हेमंत ओगले यांना तिकीट मिळाले. निवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याच्या तयारीत असलेले आमदार लहू कानडे यांनी महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अवघ्या 24 तासांत उमेदवारी मिळवली. आमदार कानडे यांच्या या राजकीय उडीची चर्चा रंगली असतानाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने तिरकी चाल चालत श्रीरामपूर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याचा सांगत माजी आमदार भाऊसाहेब कांबळेंना उमेदवारी दिली.
भाऊसाहेब कांबळे 'AB फॉर्म'सह उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, मोठा पेच निर्माण झाला. यावर काहीतरी तोडगा निघेल, असे वाटत असतानाच आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते 'नॉट रिचेबल' झाले. भाऊसाहेब कांबळे यांच्या 'नॉट रिचेबल' राहण्याच्या भूमिकेमुळे महायुतीत अधिकच गोंधळ उडाला. यातून वेगवेगळ्या चर्चांना मतदारसंघात पेव फुटला आहे. यातून काही ठिकाणी अफवा देखील सुरू झाल्या होत्या. परंतु शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे 'नॉट रिचेबल' होण्यामागे स्थानिक अदृश्य शक्ती कार्यरत होती, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. यातून महायुतीत पेच निर्माण झाला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोघांनी शिवसेनेकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. परंतु पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाले नाही. आज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या दोघा पिता-पुत्रांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.