Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली. या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवार निश्चित झाले. परंतु या उमेदवारांसमोरील बंडखोरांचे चेहरे देखील समोर आले.
या बंडखोरांना रोखण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असून, त्यांना रोखण्यासाठी थेट मुंबईत 'सागर' बंगल्यावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मंथन सुरू झालं आहे. या बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीस कोणती राजकीय खेळी करतात याची चर्चा रंगली आहे.
भाजपने रविवारी पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या अहिल्यानगर जिल्ह्यातून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe), माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, प्रतिभा पाचपुते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा समावेश आहे. यात पाचही उमेदवारांसमोर बंडखोर आहेत. परंतु यातल्या यात सर्वाधिक बंडखोरांची डोकेदुखी कर्डिले, राजळे, पाचपुते यांच्याभोवती आहे. त्या खालोखाल मंत्री विखे आणि शिंदे यांना काहीसा बंडखोरांचा सामना करावा लागू शकतो.
पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपतूनच (BJP) मोठा विरोध केला जात आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी उघडपणे मेळावा घेऊन मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला विरोध केला. भाजप आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्वीपासूनच्या समर्थक असलेल्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे या सुद्धा आता बंडाच्या तयारीत आहेत.
हर्षदा काकडे यांना 2014 मध्ये उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र ऐनवेळी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा अधिकृत 'AB' फॉर्म हा मोनिका राजळे यांना देण्यात आला. तेव्हापासून काकडे या उघडपणे आमदार राजळेंशी संघर्ष करत आहे. यंदा त्या माघार न घेण्याच्या तयारीने मैदानात उतरल्या आहेत. जनसंवाद यात्रेतून त्यांनी पाथर्डी विधानसभा मतदारसंघ ढवळून काढला आहे. हर्षदा काकडे यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपचे अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी करून आमदार राजळे यांच्या अडचणीत वाढ केली आहे. या बंडखोरांना रोखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
आमदार राजळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. हर्षदा काकडे यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. ओबीसीचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड आणि भाजपचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मोनिका राजळे यांना स्वपक्षातील नाराजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
श्रीगोंदा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.परंतु पुत्र विक्रम पाचपुते यांना उमेदवारी मिळावी, यासाठी पाचपुते पती-पत्नीने मुंबईतील सागर बंगल्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम आहे. परंतु गेल्या 14 वर्षांपासून भाजपचे काम करणाऱ्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयातील भाजप नेत्यांचे सर्व छायाचित्र हटवले आहेत. तसंच भाजपचे उमेदवार कोणीही, असो आपण अपक्ष म्हणून निष्ठावंत भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या तसेच जनतेच्या पाठिंबावर उमेदवारी करणार असल्याचं सांगून सुवर्णा पाचपुते यांनी शड्डू ठोकला आहे.
महायुतीत श्रीगोद्यांची जागा भाजप गेल्याने, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या आणि काँग्रसेचा हात सोडून मोठ्या आशाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अलेल्या अनुराधा नागवडे यांनी भाजपचा जागा जाहीर होताच, अजित पवार यांची साथ सोडली आहे. पक्षाच्या पदाचा राजीनामा देत, कोणत्याही परिस्थिती निवडणुकीलास समोरे जाणार, असा चंग त्यांनी केला आहे. नागवडे यांचा श्रीगोंद्यात राजकीय दबदबा आहे. निवडणुकीच्या मैदानात त्या राहिल्यास भाजपचे उमेदवाराला अडचणीचे ठरू शकते. पुढील दोन दिवसांत नागवडे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन श्रीगोंद्यात मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
मंत्री विखे यांना शिर्डीमधून भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांचा विरोध आहे. त्यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वी मंत्री विखेंना उमेदवारी दिल्यास भाजपची ही जागा कमी होईल, असा पत्रव्यवहार करत उमेदवारीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी शिर्डी मतदारसंघात संपर्क दौरा सुरू केला होता. त्यावेळी त्यांना विखेंच्या कार्यकर्त्यांशी संघर्ष करावा लागला. पिपाडांचा हा संघर्ष आता पडद्यामागून होण्याची चिन्हं आहेत. माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांना महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस मिळावी, अशी इच्छा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांकडे केली होती. आता प्रत्यक्षात निवडणुकीत ते काय भूमिका घेतात आणि त्यांची राम शिंदे कशी नाराजी दूर करतात, याकडे लक्ष लागलं आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे यांचे निष्ठावान नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर होताच, राहुरीतील आरएसएसचे निष्ठावान आणि भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्याचे पुत्र सत्यजित कदम नाराज झालेत. सत्यजीत कदम यांनी उघड-उघडपणे भाजपने हे चुकीचं केलं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढील दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचा इशारा सत्यजित कदम यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.