<div class="paragraphs"><p>Rohini Khadse</p></div>

Rohini Khadse

 

sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

रोहिणी खडसेंवरील हल्ला; सेनेच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

मुक्ताईनगर : आपल्यावर सोमवारी (ता.27 डिसेंबर) रात्री ज्या हल्लेखोरांनी केलेला सशस्त्र हल्ला हा केवळ धमकावण्यासाठी नव्हे तर, जिवे मारण्याच्याच उद्देशाने केला असून हल्लेखोर शिवसेनेचे पदाधिकारी व आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केला आहे. दरम्यान, खडसेंच्या वाहनावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी तीन शिवसेना पदाधिकाऱ्यांसह चार अनोळखी अशा सात जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसेंवर सोमवारी झालेल्या हल्ल्याचे आज दिवसभर जिल्ह्यात पडसाद उमटले. मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर, जळगावात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात हल्लेखोरांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

हल्लेखोर शिवसेनेचेच

रोहिणी खडसेंनी हल्ल्याची माहिती देताना हल्लेखोरांची नावेही आज उघड केली. यात शिवसेनेचा विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भाई व चांगदेवचे माजी ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दिवशीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप रोहिणी खडसेंनी केला.

नेमके त्या रात्री काय घडले होते?

वाहनावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी तीन शिवसेना पदाधिकाऱ्यांसह चार अनोळखी अशा सात जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहिणी खडसेंनी पोलिसात फिर्याद दिली.

रात्री चांगदेव येथील हळदीच्या कार्यक्रमातून परतत असताना रात्री नऊच्या सुमारास मानेगाव फाट्यापासून अर्ध्या किमी अंतरावर त्यांच्या वाहनासमोर तीन मोटरसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला. या वेळी गाडीच्या प्रकाशात चेहरे दिसून आले. त्यात सुनील पाटील याने वाहनांच्या डाव्या बाजूने येऊन पिस्तूल रोखले. चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी याच्या हातात तलवार तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यांनी वाहनाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आतून लॉक असल्याने दरवाजा उघडला नाही. यातून त्यांनी वाहनावर प्राणघातक हल्ला चढविला.

त्यानुसार मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा क्र. ४१५/२१ भादवि कलम ३०७, ३४१, ४२७, १४१, १४३, १४७, १४८, १४९ आर्म ऍक्ट २५(३),२५(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT