Balasaheb Thorat Vs Pawar: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. अशा योजना आणून राज्यातील जनतेला फसवता येणार नाही, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. याचवेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही नाशिक येथील कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी श्री थोरात यांनी अजित पवार यांच्यावर चांगलीच तोफ डागली. विशेषता लाडकी बहीण योजना आणि सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील घोषणांचा त्यांनी समाचार घेतला.
लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर, मतांचे बटन दाबा. असे उपमुख्यमंत्री पवार म्हणतात. याचाच अर्थ त्यांना बहीण नव्हे तर, सत्ता लाडकी आहे. त्यासाठीच सर्व खटाटोप सुरू आहे. हे जनतेला कळते आहे, असे थोरात म्हणाले.
लाडकी सत्ता मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारची केविलवाणी धडपड सुरू आहे. जनता हे चांगले ओळखून आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी गेल्या पाच वर्षातील भारतीय जनता पक्षाने दाखविलेला रंग आणि करामती महाराष्ट्रातील जनतेला नकोशा झाल्या आहेत. त्यामुळे यंदा महायुतीचे सरकार राज्यातून जनताच घालवेल.
राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला यश येणार नाही. लोकसभा निवडणुकीत तो अनुभव सगळ्यांना मिळाला आहे. महाविकास आघाडीची मते कमी करण्यासाठीची ही धडपड आहे. राज्यात तिसरी आघाडी अस्तित्वात नसून महायुतीच्याच काही नेत्यांकडून तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र त्याला यश येणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची जन सन्मान यात्रा सुरू आहे. त्यात उपमुख्यमंत्री पवार गुलाबी जॅकेट आणि गुलाबी व्हॅनिटी व्हॅन मधून प्रवास करीत आहेत. यावर थोरात यांनी उपमुख्यमंत्र्यांना चांगलाच चिमटा घेतला. थोरात म्हणाले, आता उपमुख्यमंत्री पवार यांनी गुलाबी रंग घेतला काय किंवा अन्य कोणता रंग घेतला काय काहीही परिणाम होणार नाही.
उपमुख्यमंत्री पवार यांचा खरा रंग जनतेला माहित झाला आहे. राज्यातील मतदारांनी त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आता गुलाबी रंग केल्याने काही होईल असे मला वाटत नाही.
प्रहार संघटनेचे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. याबाबत कडू यांच्याकडून सातत्याने विधाने केली जात आहे. यावर श्री थोरात यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. हा बच्चू कडू आणि महायुती यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.