सिन्नर : सोमठाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू भरत कोकाटे (Bharat Kokate) यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली. त्यात आमदार कोकाटे यांचे पॅनेल विजयी झाले होते. मात्र यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मॅनेज करून हा निर्णय झाल्याचा खळबळजनक आरोप आमदार कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे यांनी केला आहे.
सोमठाणे (ता.सिन्नर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाला बहुमत मिळाले असून त्यांचे बंधू भारत कोकाटे यांच्या गटाचा पराभव झाला आहे. संपर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या कोकाटे बंधूमधील या लढाईत आमदार कोकाटे जिंकले खरे पण आज भारत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत मतमोजणीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत निवडणूक निर्णय अधिकारीच मॅनेज झाल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. मोजणीच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याची लेखी तक्रार भारत कोकाटे यांनी नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांकडे लेखी स्वरुपात केली आहे. याबाबत सहकार न्यायालयातही दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमठाणे (ता.सिन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक १९ डिसेंबरला झाली. त्यानंतर मतमोजणीत निवडणूक निर्णय अधिका-यांनी मतपत्रिकेचा हिशोब लावला नाही. त्यात साशंकता असल्याचे सांगत भारत कोकाटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मॅनेज झाल्याचा आरोप केला. विभागीय सहनिबंधकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, की सर्वसाधारण कर्जदार गटासाठी असलेल्या मतपत्रिकांची संख्या ५११ होती, अवैध मतपत्रिकांची संख्या ४८ होती. या दोन्हींची बेरीज ५४९ होते, मग झालेले एकुण मतदान ५११ असतांना मतपत्रिका ५५९ कशा? महिला प्रतिनिधी गटाच्या एकूण वैध मतपत्रिका ५११, अवैध ६ अशा एकुण ५१७ व झालेले मतदान ५११ असतांना मतपत्रिका ५१७ कशा? अनुसूचित जाती जमाती गटातील वैध मतपत्रिका ४९८, अवैध मतपत्रिका १२, एकुण ५१० व झालेले मतदान ५११ मग मतपत्रिका ५१० कशा ? भटक्या विमुक्त गटातील मतपत्रिका ४९९, अवैध मतपत्रिका १० एकुण झालेले मतदान ५११ असताना मतपत्रिका ५०९ कशा? अदी प्रश्न भारत कोकाटे यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक निर्णय अधिका-यांनी संस्थेच्या निवडणुकीत दोन बुथमध्ये दोन वेगवेगळ्या पेट्यांचा उपयोग केला आहे. परंतु मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्या ताब्यात एकच मतपेटी दिलेली आहे, तीही चुकीच्या पद्दतीने व निवडणूक निर्णय अधिका-यांने स्वतःची तसेच कोणत्याही मतमोजणी प्रतिनिधीची सही न घेता सीलबंद केली आहे. संस्थेच्या सर्वच गटातील मतपत्रिकेचा हिशोब जुळत नसल्याने संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दबाव कुणाचा? आर्थिक देवाणघेवाण?
भारत कोकाटे यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत या विरोधात आम्ही सहकार न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले. सोमठाणे सोसायटीच्या निवडणुकीत नेमलेल्या निवडणूक निर्णय अधिका-याची यापूर्वी काही गावात झालेल्या सोसायटी निवडणुकांचीही चौकशी करावी अशी मागणी केली आहे. निवडणूक निर्णय अधिका-यांने कोणाच्या तरी सांगण्यावरुन राजकीय दबावाला बळी पडून आर्थिक देवाणघेवाण करत मतमोजणी प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने पार पडल्याचे म्हटले आहे. लोकशाही पध्दतीने होणा-या निवडणूक प्रक्रियेचा गळा घोटला असल्याचे म्हटले आहे. याची चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
२८ ला धरणे आंदोलन करू
तक्रारीवर भारत कोकाटे, अरुण कोकाटे, मगन कदम, दिनकर कोकाटे, सोमनाथ रुकारी, ज्ञानेश्वर कोकाटे, बद्रीनाथ कोकाटे, मधुकर धोक्रट, सोमनाथ जगताप, घमन गोसावी, छबूबाई धोक्रट, द्वारकाबाई धोक्रट, भगवान साळवे यांच्या सह्या आहेत. या निकालाविरोधात मंगळवारी (ता.२८) सोमठाणे येथील विविध विकास सोसायटीसमोर दोन तासांचे धरणे आंदोलन करणार असल्याचेही श्री. कोकाटे यांनी सांगितले आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.