BHR Society
BHR Society Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BHR Scam; ‘बीएचआर’ पतसंस्थेच्या अवसायकांची उचलबांगडी होणार?

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) राज्यात (Maharashtra) सोळाशे कोटींच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR Scam) या बहुचर्चित अवसायनातील पतसंस्थेवर नागपूर (Nagpur) येथून बदलून आलेले सहाय्यक निबंधक चैतन्य नासरे यांची आठवडाभरात उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. राज्य सहकार आयुक्तांनी केंद्रीय सहकार (Co-operative) निबंधकांना तडकाफडकी अहवाल पाठविला आहे. त्यामुळे श्री. नासरे यांना मूळ पदावर परत जावे लागण्याची शक्यता आहे. (Cooperative Department may take review of BHR auctioner appointment)

पतसंस्थेचे नवे अवसायक म्हणून शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निबंधक अशोक बागल यांच्या नियुक्तीचा प्रस्तावही केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याची चर्चा सुरु झाली आहे.

पुण्यातील डेक्कन, शिक्रापूर आणि आळंदी पोलिसांत तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यावर नोव्हेंबर २०२० मध्ये गुन्हे दाखल झाल्यावर बीएचआर संस्थेवर अवसायक म्हणून चैतन्य नासरे यांची जानेवारी २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. नासरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्कालीन चेअरमन आणि संचालकांच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण पूर्ण केले. मात्र, एमपीआयडी कायद्याने गुन्हे दाखल असलेल्या सर्व १४ जणांवर दोन वर्ष उलटूनही जबाबदारी निश्चित करता न आल्याने पुढे न्यायालयीन अडचण येणार असल्याचा ठपका ठेवत त्यांची उचलबांगडी करण्याचा अहवाल राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केंद्राकडे पाठविला आहे.

ठेवींच्या पावत्या जमा करण्याचा उद्योग अंगलट

चैतन्य नासरे यांनी गेल्या कार्यकाळात जितेंद्र कंडारे यांनी केलेल्या कारभाराचीच पुनर्रावृत्ती सुरू ठेवली. कर्जवसुलीच्या प्रमाणात ठेवीदारांना परतावा करणे गरजेचे असताना, आणि तेवढ्याच ठेवीदारांच्या मूळ पावत्या आणि केवायसी कागदपत्रे मागविण्याची आवश्यकता असताना, नासरे यांनी नुसत्याच मूळ पावत्यांची प्रकरणे जमा करून जळगाव कार्यालयात ठप्पी लावण्याचे उद्योग चालविले होते. त्यामानाने ठेवीदारांना ठेवींचा परतावा मात्र झाला नाही.

त्यामुळे राज्य सहकार आयुक्त आणि विभागीय सहनिबंधकांची नासरे यांच्याबद्दल नाराजी होती. दरम्यान, एक- एक वर्षाचा असे दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुदतवाढ न देता त्यांनी बीएचआर संस्थेचा अवसायकपदाचा राजीनामा देऊन त्यांच्या मूळ पदावर नागपूर येथे रुजू होण्याचे सहकार आयुक्तांनी आदेश दिले. असे असताना नासरे यांनी मात्र चांगले काम करीत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर वारंवार व्हायरल केल्याचा उद्योग जळगावच्या ठेवीदार संघटनेच्या एका (ठेवीदारांच्या हातून मार खाल्लेल्या) नेत्याने केला आणि ही बाब सहकार खात्याच्या वरिष्ठांच्या निदर्शनात आल्याने त्यांची मोठी अडचण झाली. येत्या आठवड्यात नासरे यांची बदली होऊन अशोक बागल यांची अवसायक म्हणून नियुक्तीवर केंद्राकडून शिक्कामोर्तब होऊन आदेश काढले जाणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT