chagan Bhujbal, Manoj jarange patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : भुजबळांच्या मतदारसंघातल्या मुस्लिम महिला सरसावल्या, मराठा आंदोलकांसाठी मोठी रसद पाठवली

Muslim women support Maratha protest : छगन भुजबळ यांच्या येवला-लासलगाव मतदारसंघातून मराठा बांधवांना लोकांनी चांगले बळ दिले आहे. आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी मतदारसंघ सरसावला आहे.

Ganesh Sonawane

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरु असलेल्या उपोषणाला सलग तिसऱ्या दिवशी परवानगी देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनातील आंदोलकांना जेवण व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी राज्यभरातून लोक पुढे येत असून ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघही त्यात मागे नाही.

छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध आहे. मात्र त्यांच्याच येवला-लासलगाव मतदारसंघातून आंदोलकांसाठी भाकरी पुरवल्या जात आहे. येवला-लासलगाव मतदारसंघातील मु्स्लिम महिलांनी देखील यात खारीचा वाटा उचलला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईत उपस्थित असलेल्या मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करण्यासाठी मुस्लिम महिला सरसावल्या आहेत. तब्बल 2500 भाकऱ्या चुलीवर थापून मुंबईच्या दिशेने मुस्लीम महिलांनी पाठवल्या आहेत.

येवला लासलगाव मतदारसंघातील मराठा कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या आंदोलकांसाठी 'एक भाकर समाजासाठी' हे ब्रीद घेऊन उपक्रम सुरु केला आहे. जो चर्चेचा विषय ठरत आहे. एक भाकर समाजासाठी उपक्रमात मराठा, ओबीसी, मुस्लिम समाजाकडूनही भाकरी, चपाती देण्यात आल्या आहे. आंदोलकांसाठी नाशिकहून जेवण व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. दिंडोरी, निफाड, पिंपळगाव बसवंत या भागांतूनही भाजीपाल्यासह तयार जेवणाची सोय करण्यात आली.

प्रत्येक घरातून दोन व्यक्तीचे जेवण होईल इतके किट तयार करून आपण आंदोलनातील बांधवांच्या पाठीशी उभे राहावे. असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांनी केलं आहे. आंदोलकांसाठी केवळ कच्चा माल पाठवून उपयोग नाही, तिथे जेवण बनवण्याची सोय होते किंवा नाही होते. त्यामुळे किटमध्ये चपाती किंवा धपाटा, शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीची चटणी किंवा पापड व मिरचीचे लोणचे असावे, असे सुचविण्यात आले आहे.

नाशिक महापालिका हद्दीत यासाठी प्रभागनिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नाना बच्छाव, विलास पांगरकर, नितीन सुगंधी, प्रफुल्ल वाघ, आशिष हिरे, बंटी भागवत, नवनाथ शिंदे, विलास जाधव, नवनाथ कोतुळे, संजय फडोळ, राम खुर्दळ, योगेश कापसे, भारत पिंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहर, तालुका यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव, देवळा, सटाणा, कळवण, चांदवड व दिंडोरी तालुक्यांमध्ये किट तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT