Nana Patole - Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil Statement: मोठी बातमी! ''...तर काँग्रेससोबत युती करण्यास तयार! ''; गुलाबराव पाटलांचं खळबळजनक विधान

Maharashtra Political News : संजय राऊतांसारखे काही कंडक्टर,ड्रायव्हर भेटले आणि...

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News: महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून करण्यात येत असलेली शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याची विधानं,दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींच्या चर्चा ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता अशा विविध घडामोडींनी आगामी काळात राजकीय समीकरणंही बदलणार असल्याचं बोललं जात आहे.

याचवेळी आक्रमक शैली आणि रोखठोक विधानं यामुळे राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं विधान केलं आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य़ करतानाच काँग्रेस (Congress) सोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. मात्र, त्याच काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. पण राहुल गांधींनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

राऊतांसारखे काही कंडक्टर,ड्रायव्हर भेटले आणि...

गुलाबराव पाटील यांनी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर ही सडकून टीका केली. पाटील म्हणाले, आम्ही यापूर्वीच उध्दव ठाकरेंना सावध केलं होतं की, पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय.

पण संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडीत भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली. शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे हिंदुत्व करता केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकतो, हे कधीच होणार नाही असं पाटील म्हणाले.

फडणवीस, अजितदादांच्या 'त्या' बॅनरवर...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले अनेक ठिकाणी बॅनर लागले आहेत. यावरही गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, नेत्यावर प्रेम असणारा कार्यकर्ता नेत्यांचे बॅनर लावतो. यापूर्वीही कार्यकर्त्यांनी माझे बॅनर लावले होते. मला राज्यमंत्रीपद मिळावं म्हणून जळगावात बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचेही बॅनर्स लागले असतील. कार्यकर्त्यांच्या भावनतेून त्याकडे पाहिले पाहिजे, असं ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT