नाशिक : (Nashik) महापालिकेत (NMC) सध्या प्रशासकीय राजवट आहे. यामध्ये सर्वाधिक काळ आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) हे प्रशासक आहेत. मात्र शहरातील समस्या जैसे थे आहेत. त्याविरोधात भाजपने (BJP) बाह्या सरसावल्या आहेत. भाजपच्या माजी नगरसेवकांनी आता थेट ‘जबाब दो’ आंदोलनाचा ईशारा दिला. (BJP Ex corporators ask reply on city issues to administrator)
गेले काही दिवस राज्यातील सत्ता आणि महापालिकेत प्रशासक यामुळे राजकीय पक्षाचे नेते वेट अँड वॉच भूमिकेत होते. महापालिकेच्या निवडणुकांबाबत देखील अनिश्चितता असल्याने निरुत्साहाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर आता भाजप सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भविष्यात प्रशासकीय व्यवस्थेशी दोन हात करण्याची भाजपची तयारी झाली असल्याचे मानले जात आहे.
महापालिकेत मागीलवर्षी मार्चमध्ये प्रशासकीय राजवट लागु झाली. त्यानंतर प्रथमच माजी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेत मागण्यांचे निवेदन देतानाच वर्षभरात रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचला.
भाजपची सत्ता असताना मंजूर करण्यात आलेल्या आयटी पार्क, लॉजिस्टीक पार्कसह रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आयुक्तांना जाब विचारला. नगररचना विभागात फाईल अडविण्याचे वाढते प्रमाण, गावठाणात चार एफएसआय देण्यासाठी झालेली कारवाई याबाबत चर्चा केली.
अंदाजपत्रक सादर करण्यासाठी झालेला विलंब, नळ जोडणीसंदर्भात दहा ते पंधरा पटींनी शुल्क वाढविताना हरकती न मागविणे, बैठकीचे निमित्त साधून अधिकारी पालिका मुख्यालयात न भेटणे, तक्रारींचा वाढता ओघ, रस्ते विकास महामंडळाला रस्ते हस्तांतरित करणे, बुजविले जात असलेले नैसर्गिक नाले आदी मुद्यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
आठ दिवसांत उत्तर न मिळाल्यास जबाब दो आंदोलन करण्याची वेळ येवू देवू नका असा ईशाराच या पदाधिकाऱ्यांनी दिला. महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, पुष्पा आव्हाड, भगवान दोंदे, वर्षा भालेराव, सतीश सोनवणे, रंजना भानसी, संभाजी मोरुस्कर आदी या वेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.