BJP delegation presenting memorandum
BJP delegation presenting memorandum Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काँग्रेसच्या पाटलांना भाजपचे आव्हान, सत्कार घेता की सत्ता सोडता!

Sampat Devgire

पाचोरा : पाचोरा- भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा आमदार किशोर पाटील (MLA Anil Patil) यांनी कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मालेगाव तालुक्याच्या धर्तीवर पोकरा योजनेत समावेश केल्यास भारतीय जनता पक्षातर्फे तुमचा सत्कार करू. अन्यथा आंदोलनाला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा भाजपने (BJP) काँग्रेस आमदार किशोर पाटील यांना दिला आहे.

या संदर्भात वीजपुरवठा व ट्रान्स्फॉर्मरप्रश्नी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्यास भाजपच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचा नागरी सत्कार करू. आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील विषय मांडून त्याचा पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावावेत व नागरी सत्काराचे मानकरी व्हावे, अथवा शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर राजीनामा देऊन सत्ता सोडावी, असे खुले आव्हान भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार पाटील यांना पत्रकार परिषदेत दिले. तसेच या मागण्या संदर्भातील निवेदन प्रांताधिकारी व वीज वितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना दिले आहे.

अमोल शिंदे यांनी गुरुवारी दुपारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी निवेदनाच्या प्रति देऊन स्पष्ट केले, की कृषिमंत्री भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश पोकरा योजनेत केला. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांचे अभिनंदन, त्याच धर्तीवर पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा. या मागणीचे निवेदन मंत्री भुसे यांना पाठवले असून, आमदार किशोर पाटील यांनी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मागणी करावी.

जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने राबविण्यात येत असलेल्या या नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत पाचोरा तालुक्यातील फक्त ३१ व भडगाव तालुक्यातील १७ अशा ४८ गावांचा समावेश यात आहे. शेतकऱ्यांची प्रचंड मागणी असली तरी नवीन गावे या योजनेत समाविष्ट केली जात नाहीत. मालेगाव तालुक्याप्रमाणे पाचोरा व भडगाव तालुक्यातील उर्वरित सर्व गावांचा पोकरा योजनेत समावेश करावा. जेणेकरून शेतकऱ्यांना गट कृषी अवजारे, शेडनेट, पॉलिहाऊस, संरक्षित शेती, प्रक्रिया युनिट, गोदाम, वेअर हाऊस, शेततळे, ठिबक व तुषार सिंचन, मधुमक्षिका पालन, रोजगार यासाठी चांगले अनुदान उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना ‘आत्मनिर्भर’ करण्याच्या दृष्टीने मोठी मदत होईल.

अमोल शिंदे पुढे म्हणाले की, आमदार किशोर पाटील हे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे असुन कृषीमंत्री, मुख्यमंत्री देखील त्यांचाच पक्षाचे आहेत. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी हा महत्त्वाचा प्रश्न कृषी मंत्र्यांकडून नक्कीच मार्गी लावल्यास भाजपच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करू असे आव्हान देत दिले. पुढे स्पष्ट केले की, पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा अनियमित व कमी दाबाने होणारा वीज पुरवठा सुरळीत करून दिवसा ८ तास वीजपुरवठा करण्यात यावा. आमदारांकडून जर या समस्या सुटत नसतील तर त्यांनी राजीनामा देऊन सत्ता सोडावी, आमदारांनी दिशाभूल करणे थांबवावे, असे खुले आव्हान अमोल शिंदे यांनी दिले. या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री, कृषिमंत्री, प्रांताधिकारी, वीज वितरण अभियंत्यांना दिलेल्या निवेदनाची प्रतही दिली.

या बैठकीस गोविंद शेलार, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिंमतसिंग निकुंभ, पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, माजी सभापती बन्सीलाल पाटील, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार, सरचिटणीस गोविंद शेलार, नगरसेवक विष्णू अहिरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, वीरेंद्र चौधरी, योगेश ठाकूर, प्रशांत सोनवणे, मच्छिंद्र पाटील, अमोल नाथ आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT