BJP Corporator in Meeting
BJP Corporator in Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News: भाजप नगरसेविका म्हणाल्या, कुठल्या तोंडाने निवडणुकीत मते मागायची!

Sampat Devgire

धुळे : केंद्र, (Centre) राज्य (State Government) आणि महापालिकेत (Dhule corporation) सत्ता असूनही भाजपचे (BJP) नगरसेवक महापालिका प्रशासनापुढे हतबल असल्याचे गंभीर चित्र स्थायी समिती सभेत गुरुवारी दिसून आले. वारंवार तेच प्रश्‍न आणि त्यावर मोघम उत्तरे अधिकाऱ्यांकडून दिली जात असल्याने पुढच्या निवडणुकीवेळी कुठल्या तोंडाने मते मागण्यासाठी जावे, असा कळीचा प्रश्‍न उपस्थित करत संबंधित नगरसेवकांनी प्रशासनापुढे हतबलता व्यक्त केली. (BJP corporatores desperate on administration`s apathetic approach)

सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. प्रभाग सहाचे नगरसेवक किरण अहिरराव यांनी कार्यक्षेत्रातील शंभर कॉलन्या चिखलात रुतल्याची तक्रार केली. त्यावर अधिकारी केवळ गुळमुळीत उत्तरे देत वेळ मारून नेतात. शासनाकडून दोनशे- पाचशे कोटींचा निधी येईल तेव्हा येईल, त्याआधी खड्डे, नादुरुस्त झालेल्या रस्त्यांवर मुरुम तरी टाका, कॉलन्यांमध्ये दिवे लावा, अशी मागणी श्री. अहिरराव यांनी केली. अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे पुढील निवडणुकीस उभे रहायला नाक राहिलेले नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

१२२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

या पार्श्वभूमीवर अभियंता कैलास शिंदे म्हणाले, की कॉलनी विकासाबाबत नव्याने १२२ कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. अंदाजपत्रकात मुरुमासाठी तरतूद नाही. आयुक्तांनीही याप्रश्‍नी निधीची तरतूद करावी लागेल. बांधकाम विभागाकडून प्रस्ताव व निविदा प्रक्रिया राबवावी लागेल, असे उत्तर दिल्यानंतर नगरसेवक अहिरराव यांनी संतप्त भावना व्यक्त केली. याचा अर्थ काहीच कार्यवाही होणार नाही, असे ते उद्विग्नतेने म्हणाले. अधिकाऱ्यांनी कॉलन्यांमध्ये फेरफटका मारावा, तेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळेल, असे नगरसेवक अहिरराव यांनी म्हटल्यानंतर सभापती नवले यांनी धोरण निश्चितीतून हा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले.

प्रशासनाचा धिक्कार

नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनीही अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. आयुक्त फक्त ऐकण्याच्या भूमिकेत दिसतात. समस्या निवारणासंदर्भात ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. अशा अकार्यक्षम प्रशासनाचा मी धिक्कार करते, अशा शब्दात संताप व्यक्त केल्यानंतर सत्ताधारी काही सदस्यांनी बाक वाजवून नगरसेविका चौधरी यांना पाठिंबा दर्शविला. शिवाय नगरसेविका चौधरी यांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत पूर्वी तक्रार केल्याची आठवण करून दिली. या जनहिताच्या प्रश्‍नावर प्रशासन कुठलीही अंमलबजावणी करीत नसल्याने नगरसेविका चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. नकाणे रोड, मोचीवाडा ते इंदिरा गार्डनपर्यंतच्या मार्गावरील खड्डे तात्पुरते बुजवावेत, अशी मागणी त्यांनी केली. पुढील निवडणुकीत कुठल्या तोंडाने जनतेसमोर जायचे, असे त्याही उद्विग्नतेने म्हणाल्या. त्यावर खड्डे बुजविण्याचे काम जीवन प्राधिकरणाचे असून, या यंत्रणेला योग्य ती सूचना दिल्याचे आयुक्तांसह सभापतींनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT