Girish Mahajan, amol mitkari
Girish Mahajan, amol mitkari sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे करू नका ; गिरीश महाजनांनी मिटकरींना सुनावलं

सरकारनामा ब्युरो

जळगाव : ब्राम्हण समाजाबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (ncp mla amol mitkari) यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे. मात्र,'मी कोणत्याही पक्षाबद्दल आणि जातीबद्दल बोललो नाही. ज्यांना वाटत असेल मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी मी माफी मागायला तयार आहे' असं म्हणत अमोल मिटकरी यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला.

राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला इस्लामपूरमध्ये सुरुवात झाली. यावेळी बोलत असताना अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानामुळे राज्यभरात भाजप आणि हिंदुत्त्वाची संघटनांनी अमोल मिटकरींच्या विधानाचा निषेध केला. अखेरीस मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं. मिटकरीच्या या विधानावर भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी टीका केली आहे. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले, ''आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये. अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे,''

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुनही राज्य सरकारवर गिरीश महाजन यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले, "सत्ताधारी तीनही पक्षांचे तोंड तीन बाजूला आहे. त्यामुळे कोणत्याही विषयी राज्य सरकारचे एकमत होत नाही. आतापर्यंत अशी स्थिती राज्याची कधी नव्हती व इतके वाईट दिवस राज्याला कधी आले नाही,''

अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मंत्रोच्चारणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मंत्रोच्चारणाचा निषेध करत ब्राम्हण महासंघाने काल पु्ण्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन केले. यावेळी या आंदोलकांचा मिटकरी यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून आला. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला.

अमोल मिटकरी मानसिक रुग्ण असल्याचे म्हणतं संतप्त झालेल्या आंदोलकांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातही घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच अमोल मिटकरींवर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ब्राम्हण महासंघाच्या आंदोलकांना विरोध करत मिटकरींची भाषा आणि भाषाशैली योग्यच असल्याचा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT