Maharashtra minister faces backlash over Operation Blue Star remarks Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Operation Blue Star : ‘ऑपरेशन ब्लू स्टार’वरून गिरीश महाजन अडचणीत; इंदिरा गांधींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं भोवलं, विरोधकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

Girish Mahajan Operation Blue Star controversy: भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन यांनी अमृतसरमधील वक्तव्याने नवा राजकीय वाद पेटला असून, काँग्रेसबरोबर ठाकरे शिवसेनेकडून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली आहे.

Pradeep Pendhare

Operation Blue Star Black Day controversy: राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वर्धापनदिनानिमित्त अमृतसर येथे केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

महाजन यांनी 1984 मधील लष्करी कारवाईला ‘काळा दिवस’ संबोधत त्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘हुतात्मे’ म्हटल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या वक्तव्यावरून भाजपवर इतिहासाचे राजकारण करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अमृतसरमधील कार्यक्रमात बोलताना महाजन (Girish Mahajan) यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची तुलना अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दाली यांच्या सुवर्ण मंदिरावरील हल्ल्याशी केली. त्यांनी दावा केला की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैन्याला पंजाब आणि सुवर्ण मंदिर परिसरात पाठवून लष्करी कारवाई केली, ज्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला. या घटनेतील दोषींना शिक्षा झाली नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

जून 1984 मध्ये भारतीय लष्कराने अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात आश्रय घेतलेल्या जर्नैल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांविरोधात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवले होते. 1 ते 10 जूनदरम्यान झालेल्या या कारवाईचा उद्देश पंजाबमधील वाढत्या दहशतवादावर नियंत्रण मिळवणे हा होता. मात्र या कारवाईमुळे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि हा विषय आजही संवेदनशील मानला जातो.

महाजन यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला. काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी इंदिरा गांधी यांच्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी तो निर्णय अपरिहार्य होता. त्या वेळी कठोर कारवाई झाली नसती तर देशासमोर गंभीर विभाजनवादी संकट उभे राहिले असते, असे ते म्हणाले.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपवर निशाणा साधला. पंजाबमधील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानसारख्या संवेदनशील मुद्द्यांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इंदिरा गांधी आणि माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांनी देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही महाजन यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. देशाच्या अखंडतेसाठी झालेल्या लष्करी कारवाईला ‘काळा दिवस’ म्हणणे गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी महाजन यांना मंत्रिमंडळातून आणि भाजपमधून बाहेर काढण्याची मागणी केली. दहशतवादाविरोधातील लढ्यात इंदिरा गांधी, जनरल वैद्य आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांनी दिलेल्या बलिदानाचा त्यांनी उल्लेख केला.

पंजाब राजकारणात पुन्हा ‘ब्लू स्टार’ची एंट्री?

महाजन यांच्या वक्तव्यामुळे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा चार दशकांपूर्वीचा विषय पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. पंजाबमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतिहास, खलिस्तानवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे पुन्हा चर्चेत येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या वादाचे राजकीय पडसाद केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पंजाबच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT