Amrish Patel Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अमरिश पटेल सलग चौथ्यांदा विधान परिषदेत; आघाडीच्या उमेदवाराची माघार

गौरव वाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

सरकारनामा ब्युरो

धुळे : भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) मध्ये साटंलोटं झाल्याने धुळे व नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक (Legislative Council Election) बिनविरोध होणार आहे. या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने अमरिश पटेल (Amrish Patel) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ते सलग चौथ्यांदा विधान परिषदेत जाणार आहेत.

धुळे-नंदुरबार (Dhule-Nandurbar) व मुंबईतील भाजपची जागा बिनविरोध करण्यासाठी कोल्हापूरात भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यामुळे पटेल यांच्याविरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच भाजप व काँग्रेसच्या नेत्यांची धावाधाव सुरू होती. प्रामुख्याने सर्वच पक्षांचं लक्ष कोल्हापुरकडे लागलं होतं.

अखेर कोल्हापुरमध्ये सतेज पाटील यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी भाजपच्या मुंबई व धुळ्यातील जागा बिनविरोध करण्यावर दोन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे अमरिश पटेल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक झाली असती तरी पटेल यांचा विजय निश्चित मानला जात होता. 2009 आणि 2015 मध्ये ते या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

अमरिश पटेल यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात अमरिश पटेल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अभिजित पाटील यांचा पराभव केला. पोटनिवडणुकीत भाजपची सर्व मते मिळवतानाच त्यांनी महाविकास आघाडीची मतेही मोठ्या प्रमाणात खेचली. आता सलग तिसऱ्यांदा ते उमेदवारी करीत आहेत.

पटेल यांची राजकीय वाटचाल

अमरिशभाई पटेल यांनी १९८५ मध्ये शिरपूर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणाला सुरवात केली. १२ वर्षे ते नगराध्यक्ष होते. १९९०, १९९५, १९९९ व २००४ अशा सलग चार निवडणुकीत ते काँग्रेसकडून शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. २००३-०४ मध्ये त्यांनी शालेय शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्रिपद भूषविले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT