NCP leader Devidas Pingle & BJP leader Dinkar Patil
NCP leader Devidas Pingle & BJP leader Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप नेते दिनकर पाटील यांची संचालकांना सभेतच शिवीगाळ?

Sampat Devgire

नाशिक : सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेची (Nashik) नुकतीच निवडणूक झाली. त्यानंतर सत्तेत आलेल्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक झाली. यावेळी विरोधी गटातील एकमेव संचालक व भाजप (BJP) नेते, नगरसेवक दिनकर पाटील यांनी सभेत गदारोळ केला. गैरवर्तणूक करीत संचालकांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली.

यासंदर्भात नगरसेवक पाटील यांचे संचालकपद रद्द करावे, असा ठराव संचालकांनी केला आहे. जिल्हा उपनिबंधकांकडे हा ठराव सादर केला आहे. त्यामुळे याप्रकरणी उपनिबंधक काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

दिनकर पाटील यांच्यावर सहकार कायदा कलम ७८ ‘अ’ अन्वये संस्थेच्या हितास बाधा पोचविणे, धोरणात्मक निर्णय प्रभावित करणे, संस्थेच्या कामात व्यत्यय आणणे, यानुसार दिनकर पाटील यांचे सदस्यत्वपद रद्द करावे, असे मत अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, उपाध्यक्ष अनिता दाते, संचालक देवीदास पिंगळे, दौलतराव पाटील, भाऊसाहेब खांडबहाले, श्रीनाथ थेटे, दत्तात्रेय थेटे, अनिल काकड, प्रदीप कडलग, रमेश डंबाळे, शांताबाई पाटील यांनी मांडले. मासिक सभेतील वस्तुस्थिती इतिवृत्तात नोंद करून तसा ठराव जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांना बहुमताने सादर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या आधीदेखील दिनकर पाटील यांनी अशाप्रकारे गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मागील संचालक मंडळाने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव केला होता. त्यावेळी १६ मार्च २०१७ ते १२ फेब्रुवारी २०२० पावतो पाटील यांना संचालक पदापासून दूर ठेवण्यात आले होते. यामुळे पुन्हा एकदा दिनकर पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचे संचालक पद रद्द होते की काय, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

‘ईडी’ची दिशाभूल : पिंगळे

नाशिक बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत बाजार समितीविरोधात दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या दाखल याचिकांवर निकाल देताना उच्च न्यायालयाने नाशिक बाजार समितीमधील व्यवहार नियमानुसार असून, कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार झाले नसल्याचे मत नोंदवत बाजार समितीसह संचालक मंडळाला क्लीन चीट दिलेली आहे.

यानंतर ही वस्तुस्थिती लपवत नगरसेवक पाटील व सुनील केदार यांनी ईडीकडे पुन्हा तोच मुद्दा घेऊन केलेली तक्रार ‘ईडी’ सारख्या उच्चस्तरीय तपास यंत्रणेची दिशाभूल करणारी तर आहेच, शिवाय न्यायालयाचा अवमान करणारीदेखील आहे. त्यामुळे आम्ही लवकरच अवमान याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती देवीदास पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांत गुन्हा दाखल

गोदावरी संस्थेच्या पहिल्याच मासिक सभेत दिनकर पाटील यांनी सभापतींसह अन्य संचालकांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी संस्थेच्या वतीने अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी दिनकर पाटील यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी पाटील यांच्याविरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT