Girish Mahajan
Girish Mahajan 
उत्तर महाराष्ट्र

राज्यात दसऱ्यानंतर काय होईल ते बघा ! गिरीश महाजनांचे भाकित

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडीमुळे राज्यातील शेतकरी व सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे राज्यात रामराज्य यावे हीच जनतेची अपेक्षा आहे. दसऱ्यानंतर बघू या काय होते, असे भाकित राज्याचे माजी मंत्री व भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी वर्तवले आहे.

मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जळगाव येथील भाजप कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार मंगेश चव्हाण, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, जळगाव महापालिकेतील नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला. आज मुक्ताईनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी भाजमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची ताकत आणखी वाढत आहे. जिल्ह्यात सर्व क्षेत्रांत भाजपचे राज्य यावे आणि रामराज्य यावे हीच जनतेची अपेक्षा आहे, त्यामुळेच लोक भाजपकडे येत आहेत.

राज्यातील जनताही आज महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पॅकेज दिले परंतु, त्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. तर कामगार,सर्व सामान्य जनता नाराज आहे त्यामुळे महाराष्ट्रात रामराज्य यावे असेही जनतेला वाटतं आहे. आता मी त्याबाबत बोलून वाद निर्माण करीत नाही मात्र दसऱ्यानंतर बघुया राज्यात काय बदल होतो ते, असेही महाजन यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलमधून काँग्रेस पक्ष बाहेर पडला आहे. याबाबत बोलताना महाजन म्हणाले, आधी झालेल्या तीन बैठकीत काँग्रेस सोबत होती. त्यावेळी ते काही बोलले नाहीत परंतु, आता ते बाहेर पडले आहेत. काँगेस पक्षाची जिल्ह्यात फारशी ताकद नाही. गेल्या वेळी त्यांचा एकच सदस्य संचालक होता. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होणार नाही. आम्ही तीन पक्ष सोबत आहोत. काँग्रेस पक्षाच्या बाहेर पडण्याच्या भूमिकेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमची चर्चा झाली आहे. अंतिम क्षणी योग्य निर्णय झाला नाही तर स्वतंत्र लढण्यास आम्ही तयार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT