Chandrashekhar Bavankule with BJP leaders of Dhule. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा!

चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवक निवडून येतील असा दावा केला.

Sampat Devgire

धुळे : गटबाजीमुळे (Groupism) काँग्रेस (Congress) पक्ष संपला. ते लक्षात घेऊन भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी गटबाजीला थारा देऊ नये. महापालिकेच्या (Dhule Corporation election) गेल्या निवडणुकीवेळी पक्षाने ५० प्लसचा नारा दिला होता. आगामी निवडणुकीसाठी ६५ प्लसचे टार्गेट डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी आज येथे केले. (BJP state President appeal to avoide groupism in party)

भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, आमदार काशिराम पावरा उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, महापालिकेत आगामी निवडणुकीतून ६५ जागा निवडून आणण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा. बूथ प्रमुखांशी नेते समन्वय राखतील. धुळ्यातील भाजपचे कार्यकर्ते क्रियाशील आहेत. कार्यकर्ता कसा असावा, हे त्यांनी राज्याला दाखवून दिले आहे. कोरोनाच्या संकटकाळात इतर पक्षांपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी धुळे जिल्ह्यात अत्यंत वाईट स्थितीत काम केले आहे. त्यांच्यामुळेच भाजपला आज चांगले दिवस आहेत.

आता संपलेल्या काँग्रेसमधील नेते नको, तर कार्यकर्ते भाजपमध्ये आणावे. त्यासाठी भाजपच्या येथील प्रत्येक कार्यकर्त्याने किमान २५ जणांचा प्रवेश भाजपत करून घेतला पाहिजे. ‘एक कार्यकर्ता, वीस घर’, अशी भाजपची योजना आहे. निवडणुकांचा काळ लक्षात घेता एका कार्यकर्त्याने वीस घरे सांभाळायची आहेत. त्यांना शासकीय योजनांबाबत अवगत करायचे आहे. त्यांच्या सुख दुःखात धावून जायचे आहे.

आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि नंतर वर्षभराने लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांकडे केवळ दोनशे दिवस शिल्लक आहेत. ते लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पुढील काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना कार्यकर्तेच मिळू नये, अशी स्थिती भाजपला निर्माण करायची आहे.

गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पत्र लिहून घ्यायचे आहेत. अशी लाखो पत्रे मला हवी आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पूर्वीच्या महाआघाडी सरकारने अडीच वर्षे वेळ घालवला. आरक्षण घालविण्याचे पाप त्यांनी केले, असा आरोप श्री. बावनकुळे यांनी केला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, कामराज निकम, नगसेवक हिरामण गवळी, डॉ. माधुरी बाफना, शिरपूरचे माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रकाश चव्हाण, यशवंत येवलेकर, सुरेश पाटील, जिल्हा परिषद सभापती धरती देवरे, सदस्य राम भदाणे, प्रवक्ते संजय शर्मा, अरुण धोबी, बबन थोरात, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मायादेवी परदेशी, माजी महापौर जयश्री अहिरराव आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT